Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६

जिल्हा बँक निवडणूक: नाशिकमध्ये गुन्हा दाखल असलेला संशयित उमेदवार विनोद तराळ यास तात्काळ अटक करा; अक्षय महाजन यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार



अंतुर्ली (वार्ताहर): जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नाशिक येथील गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी विनोद रामदास तराळ याने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला असतानाही हा संशयित उघडपणे निवडणुकीत वावरत असल्याने त्यास तात्काळ अटक करण्यात यावी, अशी लेखी तक्रार अंतुर्ली येथील अक्षय सुधीर महाजन यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे की, नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. १६४/२०२५ अन्वये शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात विनोद रामदास तराळ हा आरोपी आहे. भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध गंभीर कलमांनुसार त्याच्यावर हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (नाशिक रोड) यांनी ०४/०८/२०२६ रोजी, तर उच्च न्यायालय मुंबई यांनी १३/१०/२०२६ रोजी फेटाळला आहे.

न्यायालयाने दिलासा नाकारल्यानंतरही संशयित अद्याप तपास यंत्रणेच्या हाती लागलेला नाही. असे असताना तो जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत उघडपणे सहभागी होऊन त्याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशा व्यक्तीच्या मोकाट वावरामुळे कायद्याचा धाक कमी होत असून तपासावर परिणाम होण्याची तसेच साक्षीदार व तक्रारदारांवर दबाव येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, नाशिक रोड पोलीस व तपास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विशेष पथकाद्वारे त्यास तात्काळ अटक करावी, आवश्यक असल्यास फरार घोषित करून मालमत्ता जप्तीची कायदेशीर कारवाई करावी, तसेच अर्जावरील सूचक व अनुमोदकांचीही चौकशी करावी, अशी मागणी अक्षय महाजन यांनी केली आहे. याशिवाय, निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांनाही संशयितावरील गुन्ह्यांची व जामीन फेटाळल्याची माहिती तात्काळ द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यांची होती निवेदन देताना उपस्थिती
अक्षय महाजन यांचे समवेत मुनाफ सर, व्ही आर महाजन, कृष्णा महाजन, कृष्णल पाटील, आदिनाथ बोरसे, राजू शिरतुरे ,अनिल वाडीले ,बबलू मढे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध