Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२६

दिंडोरीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! पोलीस अधीक्षकांच्या आदेशांना केराची टोपली; कारवाईचा धाक नेमका कुणाला ?



दिंडोरी प्रतिनिधी :- 
दिंडोरी पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच कथित अवैध धंदे सुरू असल्याच्या चर्चेने खळबळ; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशांची अंमलबजावणी होतेय तरी कुठे?
दिंडोरी शहरात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. क्लब, मटका, सोरट यांसारखे कथित अवैध व्यवसाय शहरातील विविध ठिकाणी सुरू असल्याचे आरोप होत असून, या प्रकारांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, दिंडोरी पोलीस स्टेशनच्या अगदी समोर असलेल्या प्रतीक वाईनच्या गल्लीमध्येच असे प्रकार सुरू असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
बसस्थानक परिसर, दिंडोरी पोलीस स्टेशनसमोरील प्रतीक वाईनच्या गल्लीतील परिसर तसेच पालखेड बंधारा या ठिकाणी क्लब, मटका व सोरटसारखे कथित अवैध प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात आणि पोलीस ठाण्याच्या नाकाखालीच असे प्रकार सुरू असल्याचे आरोप होत असतील, तर पोलिसांच्या गस्तीचा आणि गोपनीय माहिती यंत्रणेचा उपयोग नेमका कशासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पोलीस अधीक्षकांकडून अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले जात असताना स्थानिक पातळीवर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का? की हे आदेश केवळ कागदावरच राहतात? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
अवैध धंदे चालविणाऱ्यांना अभय कुणाचे?
शहरात अवैध धंद्यांचे जाळे वाढत असल्याच्या तक्रारी असूनही ठोस कारवाई दिसत नसेल, तर त्यामागचे कारण काय, याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे. संबंधित ठिकाणांची गोपनीय पद्धतीने तपासणी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिंडोरीकडे विशेष लक्ष देण्याची गरज!
दिंडोरी शहरातील कथित अवैध धंद्यांची स्वतंत्र चौकशी करून संबंधित पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घ्यावा. अवैध व्यवसायांना कोणाचे पाठबळ आहे का, याचीही निष्पक्ष चौकशी व्हावी. अन्यथा पोलीस अधीक्षकांचे आदेश केवळ कागदावर आणि अवैध धंदे मात्र खुलेआम, अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आता प्रश्न एकच — दिंडोरी पोलिसांना या अवैध धंद्यांचे आव्हान दिसत नाही की दिसूनही कारवाई होत नाही?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध