नाशिक प्रतिनिधी : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला धुळे येथील प्रशांत वाडिले याने चौकशीदरम्यान आर्थिक व्यवहारांची साखळी उघड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपासादरम्यान त्याने ३४ पेक्षा जास्त बोगस शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी प्रत्येकी सुमारे साडेचार लाख रुपये घेतल्याची कबुली दिल्याचे समोर आले असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासात वाडिलेने रोख पैशांच्या व्यवहाराचे स्वतंत्र नेटवर्क उभारल्याचेही निष्पन्न झाले आहे. तो व्यवहारांसाठी रोख रकमेची देवाणघेवाण करत असल्याचे समोर आले असून, यासाठी त्याने स्वतःच्या वाहनचालकाची मदत घेतल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून वाडिलेच्या प्रवासाची माहिती (जर्नी हिस्ट्री) मिळाली आहे. या आधारे तपास यंत्रणा आणखी काही संशयितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
नाशिक विभागातील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आदेश तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सुमारे १,२०० संशयितांची नावे समोर आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, संस्थाचालकांकडून एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने पैसे घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, प्रस्तावांची हालचाल, मंजुरीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले जात होते. त्यानंतर संबंधित शिक्षकाचा शालार्थ आयडी तयार करून वेतन प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला जात होता. या संपूर्ण साखळीत वाडिले मध्यस्थ म्हणून कार्यरत होता का, याचाही तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे वाडिलेसारखे आणखी काही एजंट लवकरच तपासाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
या व्यवहारांमधून नेमके कोण लाभार्थी होते आणि किती शिक्षकांच्या प्रकरणांमध्ये अशाच प्रकारे गैरव्यवहार झाला, याचा सखोल तपास सुरू आहे. सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत आहे.
राजकीय पदाची ढाल, फसवणुकीचा जाळा; 'नेतागिरी'च्या आड काळा कारभार
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी चार जिल्ह्यांतील ८९४ शिक्षकांवर तसेच तीन माजी उपसंचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही संस्थाचालकही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रशांत वाडिले याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. संस्थाचालक आणि राजकीय पदाधिकारी अशी प्रतिमा निर्माण करून तो फसवणुकीचे जाळे अधिक मजबूत करत असल्याचा संशय तपासातून व्यक्त करण्यात येत आहे.
तपासात मोठा खुलासा; १६ संशयितांविरोधात ठोस पुरावे, कारवाईची टांगती तलवार
तपासादरम्यान आतापर्यंत १६ संशयितांविरोधात ठोस पुरावे मिळाले आहेत. यापूर्वी या प्रकरणात तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, किरण पाटील आणि राहुल पवार यांना अटक करण्यात आली होती. प्रशांत वाडिले हा या प्रकरणातील चौथा अटक झालेला संशयित आहे. प्राथमिक तपासानुसार, या संपूर्ण रॅकेटने संघटित पद्धतीने शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकशीसाठी १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी; आणखी धक्कादायक खुलास्यांची शक्यता
प्रशांत वाडिले याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान त्याने काही प्रभावशाली व्यक्तींची नावे सांगितल्याची माहिती समोर येत असून, त्या दिशेनेही तपास सुरू आहे.
वाडिलेचा धक्कादायक कबुलीजबाब; गैरव्यवहाराची संपूर्ण साखळी उघड
वाडिलेच्या कबुलीनुसार, एखाद्या संस्थेत शिक्षकाचे रिक्त पद निर्माण झाल्यानंतर किंवा तसे दाखवून विविध प्रशासकीय मान्यतांच्या प्रक्रियेचा आर्थिक व्यवहारासाठी वापर केला जात होता. रिक्त पदाची मान्यता, बिंदुनामावली (रोस्टर) मंजुरी, आकृतिबंध किंवा पदनिर्मितीची मान्यता, भरती परवानगी तसेच नियुक्ती प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळवून देण्यासाठी वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले होते. या प्रत्येक टप्प्यावर स्वतः एजंट म्हणून काम केल्याची कबुली वाडिलेने दिल्याचे तपास सूत्रांनी सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा