Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२६

दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवत जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा होणार!



अमळनेर : तरूण गर्जना रिपोट:- लुक्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकरी बांधवांवर ओढवलेले संकट लक्षात घेता, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई अनिल पाटील यांचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तो गरजू शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी वापरण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

आज, दि. २५ नोव्हेंबर रोजी जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस असून, दरवर्षी कार्यकर्त्यांकडून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी पिके पाण्याअभावी करपली असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत उत्सवापेक्षा शेतकऱ्यांना आधार देणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका घेण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त हार, शाल, बुके किंवा इतर भेटवस्तू आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याऐवजी शेतकरी बांधवांना शक्य ती आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू शेतकऱ्यांना मदत, अन्नदान, पाणीवाटप, आरोग्य शिबिरे तसेच इतर समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर देण्यात यावा. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच खऱ्या अर्थाने वाढदिवसाची भेट ठरेल, असा संदेश या आवाहनातून देण्यात आला आहे.

जयश्रीताई पाटील यांनी नेहमीच सामाजिक कार्याला प्राधान्य दिले असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनीही समाजहिताला सर्वोच्च स्थान देत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील आणि शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध