Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ मे, २०२०

कोरोना लॉकडाऊन आणि विद्यार्थी



कोरोना या संसर्गजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातलेले आहे.याला भारत देश तरी कसा अपवाद असेल...आज रोजी भरत देशात देखील मोठे सावट पसरलेले आहे.तर महाराष्ट्रात तर अगदी चिंतेची बाब आहे.महाराष्ट्रात पॉझिटिव्ह संख्या 11506 एवढी आहे. खबरदारीचा सुरक्षा उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने 14मार्च पासून शहरी व 16मार्च पासून ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद केल्या,याअगोदर देखील महाराष्ट्रात सातारा-सांगली-पुणे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे काही दिवस शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या.

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढणे गरजेचे आहे.नुकसान भरून काढणे म्हणजे परीक्षा पुढे ढकलणे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही, याची काळजी घेणे होय. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, मजुर लोकांची मुले डोळ्यांसमोर ठेवून शाळा बंदच्या काळात या समाजघटकातील मुलांचे शिक्षण कसे अखंडपणे चालू राहील याची योजना केंद्र व राज्य सरकारनी तातडीने करायला हवी होती.

करोना विषाणूची साथ हे  जगासमोरचे मोठे संकट आहे. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूंवर या संकटाने हाहाकार माजवला आहे. या रोगाला अजून प्रतिजैविके न सापडल्यामुळे रोग होऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपाय योजणे एवढाच आता सर्वांसमोर पर्याय शिल्लक आहे. म्हणून लॉकडाउनचे धोरण अवलंबून हा रोग आटोक्यात आणण्याचा सर्व देशांत प्रयत्न चालू आहे. या परिस्थितीतून निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे जगभर भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

जगाच्या व देशाच्या अर्थव्यवस्था लॉकडाउनमुळे मंदी, बेरोजगाराच्या चक्रात सापडल्याआहेत.थांबल्या अर्थव्यवस्थेमुळे हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांचे तांडे, शहराकडून गावाकडे निघाले आहेत व उपासमारीने मरायचे, की करोनामुळे; या पेचात हा कष्टकरी वर्ग अडकला आहे.
जागतिक सत्ता केंद्र युरोप-अमेरिका खंडाकडून आशिया खंडातिला भारत देशाकडे  सरकत आहे. लॉकडाउनमुळे येणाऱ्या सक्तीच्या रिकामेपणामुळे व एकटेपणामुळे विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक-सामाजिक-मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

करोनाला रोखण्यासाठी अनेक देशांनी शिक्षणसंस्थासुद्धा बंद केल्या आहेत. 'युनेस्को'च्या अहवालानुसार एप्रिल २०२०मध्ये १८८ देशांत १५४ कोटी विद्यार्थी घरी बसले आहेत. भारतात १५ लाख शाळा बंद आहेत. त्यामुळे २६ कोटी विद्यार्थी व ८९ लाख शिक्षक घरी बसले आहेत, तर उच्च शिक्षणात ५० हजार शिक्षणसंस्था बंद आहेत व ३.७० कोटी विद्यार्थी आणि १५ लाख महाविद्यालयीन शिक्षक घरी बसले आहेत. ३० कोटी विद्यार्थ्यांनी रिकामेपणे घरी बसणे हा एक मोठा तोटा आहे व कदापी भरून न येणारे नुकसान आहे. सध्या करोनाची समस्या ही केवळ आरोग्याची समस्या आहे, असे मानले जात आहे; पण या संकटाला शैक्षणिक समस्यांची बाजू आहे, हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे.

लोकांचे रिकामेपण, एकटेपणा घालविण्यासाठी रामायण, महाभारतसारख्या मालिका दूरदर्शनवर दाखवून भूतकाळातल्या आभासी जगात जनतेला रमवून ठेवून,गुंतवून ठेवून, वर्तमानातील समस्यांवर मात करता येणार नाही.आता मंत्र-तंत्र वापरून विद्या मिळवण्याचे,पाण्यावरून,अग्नीवरून चालण्याचे दिवस नाहीत.आजचा शिष्य अगदी गुरुच्या पुढे आहे.  'युनेस्को'ने शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्येवर तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना आपल्या सभासद देशांना दिल्या आहेत. शिक्षणात आलेल्या या व्यत्ययाने मुलांना शिक्षण हक्कापासून वंचित राहावे लागत आहे, असे मत 'युनेस्को'ने आपल्या अहवालात नोंदविले आहे. दूरशिक्षण, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, यू-ट्यूब, हॅगआउट, मल्टिमीडिया, मोबाइल फोन, ई-लायब्ररी, दूरदर्शन इ. माध्यमांतून अनेक देशांनी तातडीने, मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, म्हणून वरील प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. भारतात मात्र परीक्षा रद्द करणे, परीक्षा पुढे ढकलणे, परीक्षा न घेता मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे एवढ्यापुरतेच निर्णय घेतले जात आहेत. परिस्थितीची अनिश्चितता लक्षात घेतली, तर भारतानेसुद्धा दीर्घ काळासाठी शैक्षणिक धोरण ठरविणे आवश्यक आहे. भारतात उच्च शिक्षणात व मेडिसीन, इंजिनीअरिंग, कॉमर्स व मॅनेजमेंट यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

समस्या आहे, ती बहुसंख्य कष्टकरी, गरीब वर्गातील मुलांची. भटके-विमुक्त, आदिवासी, ग्रामीण भागांतील सरकारी किंवा अनुदानित शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींची!
माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणाचा प्रसार, शिक्षणाचा विस्तार, शिक्षणाचा दर्जा, शिक्षणाची संधी वाढविण्यास भरपूर वाव आहे. 'ट्राय'च्या अहवालानुसार भारतात २०२०मध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ६८.४५ कोटी आहे. मोबाइल फोन वापरणाऱ्यांची संख्या ४८.८२ कोटी आहे. तर, इंटरनेटसह स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या ४०.७२ कोटी आहे. तर टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या ७६ कोटी आहे. हा माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार झालेला दिसत असला, तरी त्यात प्रचंड विषमता आहे. भारतात ५२ टक्के जनता इंटरनेटचा वापर करते. म्हणजे निम्मा भारत इंटरनेटच्या लाभापासून वंचित आहे.

केंद्र शासनाने, महाराष्ट्र शासनाने,दूरदर्शन व इतर चॅनलचा वापर करून दररोज एक-दोन तास शैक्षणिक विषयांवर आधारित त्या त्या विषयातील पारंगत शिक्षकाचे मार्गदर्शन करण्याची सोय करायला हवी होती.जेणेकरून शालेय विद्यार्थी प्रवाहाच्या बाहेर गेला नसता.

परंडा येथील विद्यार्थ्यांच्या हक्काचे व्यासपीठ असणारे राज्यस्तरीय साप्ताहिक विचार विद्यार्थ्यांचे द्वारे महाराष्ट्र राज्यात सर्व प्रथम विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले गेले. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.तसेच वेळोवेळी संपादक अमोल निकाळजे  उपक्रमाचे आयोजन करतात.अशा उपक्रमाद्वारे देखील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर , मनावर जो सुट्टीत गंज चंडलेला आहे असा गंज काही प्रमाणात काढला जात आहे. किंवा याद्वारे देखील विद्यार्थी शालेय प्रवाहात रहात आहे.त्याचं बरोबरच पालकांना देखील लॉकडाऊनमुळे वेळ मिळत आहे. पालकांनी देखील दररोज किमान दोन तास तरी वेळ आपल्या पाल्याला देणे गरजेचे आहे.त्याचा सराव घेणे, उजळणी घेणे, नवीन माहिती देणे गरजेचे आहे.आम्ही आमच्या सनराईज स्कूलच्या विद्यार्थ्यांना दररोज व्हट्सअपच्या माध्यमातून अभ्यास देत आहोत. सर्व विषयाचे सराव पेपर देखील देऊन सोडवून घेतले.50%ते 60%पालकांनी प्रतिसाद देत पेपर सोडवून घेऊन संबधित शिक्षकांकडून व्हट्सअपद्वारे  चेक देखील करून घेतले.
विद्यार्थ्यांना वारंवार सराव करणे गरजेचे आहे,हे एका कथेतून सांगतो,जेणेकरून लवकरलक्षात येईल.

एकदा भगवान इंद्र शेतकऱ्यांवर चिडले.(आता देव म्हटल्यावर आशीर्वाद शाप आलाच) त्यांनी जाहीर केले की 12 वर्षे पाऊस पडणार नाही. आपण पिके घेण्यास सक्षम नसाल.भगवान इंद्रांकडून शेतकऱ्यांनी  विनम्रतेची विनवणी केली. तेंव्हा इंद्र देव म्हणाले की, भगवान शिवने आपला डमरू वाजविला ​​तरच पाऊस शक्य आहे. परंतु त्यांनी भगवान शिव यांच्याशी गुप्तपणे चर्चा करुन आधीच या शेतकऱ्यांशी सहमत न होण्याची विनंती केली  होती.जेव्हा शेतकरी भगवान शिवकडे आले तेव्हा त्यांनी १२ वर्षानंतर डमरु वाजवला जाईंल असे सांगितले ..निराश शेतकरीयांनी 12 वर्षांपर्यंत थांबायचे ठरवले.परंतु एक शेतकरी नियमितपणे राबत होता, मशागत करत होता . बियाणे पेरत होता. इतर शेतकरी त्या शेतकऱ्याची  चेष्टा करत होते.काही वर्षांनी, इतर शेतकऱ्यांनी त्याला  विचारले , “१२ वर्षे पाऊस पडणार नाही हे आपणास माहित असताना तुम्ही आपला वेळ व उर्जा का वाया घालवत आहात?”त्याने उत्तर दिले, “मला माहीत आहे का पीक  येणार नाही .. परंतु मी हे काम मी केवळ “सराव ”म्हणून करतो आहे.  12 वर्षानंतर मी पिके उगवण्याची आणि शेतात काम करण्याची प्रक्रियाच विसरुन जाईन. शरीराची श्रम करण्याची सवय मोडेल, म्हणूनच मी हे करत राहतो जेणेकरून 12 वर्षानंतर पाऊस पडल्यावर मला काम करणं अवघड वाटणार नाही ” त्यांचा युक्तिवाद ऐकून देवी पार्वतीस  कौतुक वाटले व  ती भगवान शिवला मजेत म्हणाली , “तुम्ही पण 12 वर्षानंतर डमरू वाजवणे विसरू शकता!”
भगवान शिवलाही काळजी वाटली. डमरु वाजतो की नाही हे तपासण्यासाठी म्हणुन त्यांनी  डमरू वाजवण्याचा प्रयत्न केला. डमरुचा  आवाज ऐकताच पाऊस पडु लागला .आणि  नियमितपणे काम करणाऱ्या त्या शेतकऱ्यांच्या शेतात  भरभरून पीक आले, बाकी सगळ्यांना मात्र पश्चाताप झाला..

यातून तुम्हाला सांगायचे तात्पर्य येवढेच की “ सराव “आपल्याला परिपूर्ण बनवितो. सराव म्हणजे गुणवत्ता टिकण्याचे सार. सराव म्हणजे तारुण्याचे गुपित..4 आठवडे, 4 महिने किंवा वर्षानंतर कधीतरी लॉकडाउन संपेल..त्याकडे डोळे लावुन बसण्याऐवजी  एक गोष्ट नक्की करा .. ज्या विषयात तुम्ही कमी आहात किंवा मागे आहात , त्यातील आपली कौशल्ये धारदार करीत रहा, आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा अभ्यास करा आणि आपले ज्ञान वाढवत रहा .आज आपल्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा, स्वतःला अजुन कसं चांगले करता येतील याकडे लक्ष द्या.जेणेकरुन जेव्हा पुन्हा काम करायची वेळ येईल तेव्हा सगळी आव्हाने पूर्ण करण्यास तयार असाल..
   
स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ही लढाईच्या आगोदर शश्र आश्र लावण्याची संधीच आहे.याचं संधीच सोनं करणं गरजेचे आहे.लॉक डाऊन संपल्या बरोबरच कधी शासन परीक्षाची जाहिरात काढेल,व अचानक भरतीची घोषणा करेल हे सांगता येत नाही.त्यामुळे या शांततेच्या काळाचा योग्य सदुपयोग करणे आपल्या हातात आहे.
म्हणतात ना ' 'शांततेच्या काळात घाम गळाला तर युध्दाच्या वेळी रक्त सांडावें लागत नाही.

आपण लवकरच या भीषण संकटातून सावरू,प्रशासनाच्या आदेशाचे, सूचनांचे पालन करा, घरीच रहा, सुरक्षित रहा.

राहूल शिंदे (सहशिक्षक सनराईज स्कूल,शेळगांव ता.परंडा जि उस्मानाबाद)

1 टिप्पणी:

प्रसिद्ध