Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ जुलै, २०२०

पती पत्नीचा किरकोळ वाद…..!गळा दाबून जावयाचा खून….!



शिरपूर प्रतिनिधी : स्वयंपाक केला नाही म्हणून पती- पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर रागाच्या भरात सासऱ्यासह दोन्ही शालकांनी जावयाला मारहाण करत गळा दाबुन संपवल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील जुनेभामपुर येथे दि १२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे.

शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे अजय बन्सीलाल भिल वय २२ याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, विजय बन्सीलाल भिल व कविता विजय भिल या दोन्ही पती पत्नींमध्ये नेहमी किरकोळ भांडण होत होती. दि १२ रोजी विजय भिल शेतातून मजूरीचे काम करून घरी आल्यानंतर दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घरात कविता भिल यांनी स्वयंपाक न केल्याने विजय भिल व कविता विजय भिल यांच्यात भांडण झाले होते.

४ वाजेच्या सुमारास फिर्यादी अजय भिल हे घराच्या मागच्या बाजूस बसलेले होते तर त्यांची आई घराबाहेर पुढे बसल्या होत्या यावेळी फिर्यादी अजय भिल यांंना जोर जोराने शिवीगाळचा आवाज येऊ लागल्याने फिर्यादी अजय घराच्या पुढील बाजूला पाहण्यासाठी गेला असता तेथे विजय भिल यांचे सासरे ओंकार शंकर ठाकरे व अंबालाल ठाकरे व ज्ञानेश्वर ओंकार ठाकरे हे दोन शालक सर्व रा.जावदा ता.शहादा जि.नंदुरबार व विजय भिल हे दिसले.

त्यावेळी ओंकार शंकर ठाकरे हे विजयच्या छातीवर जोरजोराने हाताबुक्यांनी मारहाण करत माझ्या मुलीला फाशी लावतोस का ? तु मेला तरी चालेल आम्ही जेलात जाण्यास तयार आहोत असे आयराणी भाषेत जोर जोराने बोलत शिवीगाळ करत ज्ञानेश्वर ठाकरे याने विजयचा डावा हात पकडला तर अंबालाल ठाकरे याने विजयचा उजवा हात पकडुन विजयचा जोराने गळा दाबला.त्यावेळी विजयचा श्वास कोंडल्याने तो हातपाय झटकू लागला.घटनास्थळी गर्दी जमल्यानंतर ओंकार ठाकरे,अंबालाल ठाकरे ,ज्ञानेश्वर ठाकरे यांनी कविता ठाकरे व त्यांच्या मुलांना घेऊन सोबत आणलेल्या दोन मोटरसायकलीवर निघुन गेले यावेळी सोबत अनोळखी व्यक्ती आला होता.

विजय याला त्याच अवस्थेत शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तेथे विजय भिल यास डॉक्टरांनी तपासून म्रुत घोषित केले असे फिर्यादीत अजय भिल याने म्हटले आहे.ओंकार भिल अंबालाल भिल व ज्ञानेश्वर भिल या तिघांविरुध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध