Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

पश्चिम विदर्भाच्या वार्षिक योजनांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडून १३८० कोटी रुपयांचं गिफ्ट...



पश्चिम विदर्भासाठी वार्षिक योजनांसाठी अजित पवार यांनी कोट्यवधी रुपयांचं गिफ्ट दिलं. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांबाबत अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी, तसेच रिद्धपूरसह विविध स्थळांच्या विकासासह पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांच्या 2022-23 च्या जिल्हा वार्षिक योजनांसाठी सुमारे 1 हजार 380 कोटी रुपयांच्या निधीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा नियोजन समित्यांची कामगिरी प्रभावी आणि उत्कृष्ट करण्यासाठी प्रोत्साहनपर आव्हान निधी राखीव ठेवण्यात आला असून, महसूल विभागातील एका जिल्ह्याला 50 कोटी रूपये अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. त्यानुसार जिल्ह्यांनी चांगल्या कामगिरीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी दिले.
लोकप्रतिनिधी व प्रशासनाची मागणी लक्षात घेऊन आवश्यक कामांसाठी मंजूर नियतव्ययापेक्षा वाढीव निधी बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेसाठी अमरावती जिल्ह्यासाठी 320 कोटी, अकोला जिल्ह्यासाठी 200 कोटी, यवतमाळ जिल्ह्यासाठी 345 कोटी, वाशिम जिल्ह्यासाठी 200 कोटी व बुलडाणा जिल्ह्यासाठी 315 कोटी निधी मंजूर करण्यात आला.
अमरावती जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेत सायन्सस्कोर मैदान विकास, मेळघाटातील तीन गावांत सौर ऊर्जाधारित वीजपुरवठा ही कामे राबविण्यात आली. त्याचप्रमाणे, महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मेळघाट हाट व जे जे स्कूल ऑफ आर्टच्या मदतीने पर्यटन विकासासाठी सौंदर्यीकरण प्रकल्प निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. अकोला जिल्ह्यात विविध शहरात स्टेम लॅब, नेहरु पार्क येथे हुतात्मा स्मारक, वाशिम जिल्ह्यात पारवाबोरवा येथे नाविन्यपूर्ण प्रकल्प, बुलडाणा जिल्ह्यात पलढण धरण येथे नौकाविहार, रोपमळे निर्मिती आदी वैशिष्ट्यपूर्ण कामांचा समावेश आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध