Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

नरडाणा येथे बनावट पिस्तूल, जिवंत काडतूस व घरफोडीचा माल जप्त – दोन चोरट्यांना अटक


दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे सुमारास नरडाणा पोलिसांनी गस्तीदरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत ८८,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलिस अहवालानुसार, त्या दिवशी पहाटे सुमारास पोलिस पथक शिरपूरहून नरडाणा गावाकडे गस्तीस असताना पुलाजवळ दोन संशयास्पद युवक दिसले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे अजित रेमा ठाकूर (रा. खळवाणी, ता. नेवाली, जि. बडवानी, मध्यप्रदेश) व बाळकृष्ण अशोक मिश्रा (रा. नेवाली, जि. बडवानी, मध्यप्रदेश) अशी सांगितली.

तपासादरम्यान त्यांच्याकडून एक बनावट पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन कटर्स, दोन पेंचेस, एक लोखंडी चपटी रॉड, एक मोबाईल फोन व हिऱो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (एम.पी.४६ ए.के. ८७३५) असा एकूण ८८,४८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी नरडाणा परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पूर्वी ते शिरपूर व नेवेली भागातही घरफोडीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या कारवाईत पोलिस निरीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. सुनिल गोसावी, तसेच पथकातील पोलीस नाईक ललित पाटील, भरत चव्हाण, गणेश पाटील, योगेश गिते, अर्जुन मोरे, विजय माळी, दीपक भामरे, राकेश चौधरी आदींचा सहभाग होता.

नरडाणा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, या अटकेमुळे अलीकडच्या घरफोडी व चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बेटावद प्रतिनिधी :हरिष माळी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध