Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

जीवघेणी पाईपलाईन बनली अपघातांचा सापळा!! शिरपूर नगरपरिषद व ठेकेदार कंपनीचा घोर निष्काळजीपणा



शिरपूर प्रतिनिधी/ शिरपूर-वळवाडे नगरपरिषदेकडून राज्यस्तरीय योजना व इतर शासकीय निधीतून श्रीकृष्ण कॉलनी ते श्रीनगर कॉलनी, मिलिंद नगर परिसरात सिमेंटचे रस्ते व फुलबांधणीचे कोट्यवधी रुपयांचे काम शिरपूर कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आले. मात्र या कामात अव्वाच्या सव्वा निष्काळजीपणा झाल्याचे समोर आले आहे.

मुख्य रस्ता तयार करताना मिलिंद नगर व श्रीनगर येथील पाण्याच्या टाकीस जोडणारी मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईन स्थलांतरित न करता थेट सर्व्हिस रोडखाली दाबून ठेवण्यात आली. एवढेच नव्हे तर त्या लाईनचा मेन कॉक वॉल हा अगदी रस्त्याच्या मध्यभागी, भर चौकात, वळणावर उघडा ठेवण्यात आला आहे.

या उघड्या लोखंडी पाईपमुळे अनेक चारचाकी वाहनांचे चेंबर फुटले, दोनचाकी चालक अपघातग्रस्त झाले, तर पादचारी नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. काही ठिकाणी किरकोळ तसेच गंभीर अपघातही घडले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन व ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केले असून, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिकांनी इशारा दिला आहे की —

“जर या पाईपलाईनमुळे आणखी एखादा अपघात झाला किंवा जीवितहानी घडली, तर त्यासाठी शिरपूर-वळवाडे नगरपरिषद व संबंधित ठेकेदार कंपनी पूर्णपणे जबाबदार राहील.”





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध