Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

मुंबईचा अमली पदार्थ तस्कर थाळनेर पोलिसांच्या जाळ्यात; 'शिवाई' बसमधून १० किलो गांजा जप्त!!



थाळनेर (प्रतिनिधी): राज्य परिवहन मंडळाच्या लक्झरी 'शिवाई' बसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या मुंबईच्या एका तस्कराला थाळनेर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून अटक केली आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या या धडक कारवाईत १० किलो गांजासह ८६,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत पाटील हे आपल्या पथकासह शिवजयंतीनिमित्त पेट्रोलिंगवर होते. यावेळी पोसई समाधान भाटेवाल यांना गुप्त बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली की, जळगावकडून शिरपूरकडे जाणाऱ्या हिरव्या रंगाच्या 'शिवाई' इलेक्ट्रिक बसमध्ये (MSRTC) एक प्रवासी गांजा घेऊन प्रवास करत आहे.

माहिती मिळताच पोलिसांनी शिरपूर-चोपडा रोडवरील सावेर शिवारात असलेल्या 'जय पेट्रोल पंपा'जवळ नाकाबंदी केली. संशयास्पद बस येताच पोलिसांनी ती थांबवून झडती घेण्यास सुरुवात केली.

बॅगेत सापडले गांजाचे पुडे

बसची तपासणी करत असताना मागील सीटवर बसलेल्या एका तरुणाकडे काळ्या रंगाची बॅग दिसली. पोलिसांनी पंचांसमक्ष त्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात खाकी रंगाच्या चिकटपट्ट्या लावलेला एक मोठा पुडा आढळून आला. त्यातून गांजाचा उग्र वास येत असल्याने पोलिसांनी अधिक तपास केला असता, त्यात १० किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीची ओळख

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव मुस्तफा जिलानी शेख (वय ३६) असून तो मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) भागातील गिल्बर्ट टेकडी, जनता कॉलनी येथील रहिवासी आहे. मुंबईच्या बाजारपेठेत हा गांजा पोहोचवण्याचा त्याचा डाव होता, मात्र त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला.

यांनी केली कारवाई

ही धडक कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, आणि शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहभागी टीम:

सपोनि हेमंत पाटील (प्रभारी अधिकारी, थाळनेर पो.स्टे.)
पोसई समाधान भाटेवाल, पोसई हर्षल पाटील
पोलीस कर्मचारी: दिनेश महाले, रावसाहेब पाटील, उमाकांत वाघ, अनिकेत साळुंखे, रविंद्र मोरे, रामकृष्ण बोरसे, आणि दिलीप मोरे.

पोलिसांचा इशारा: 

अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरोधात थाळनेर पोलिसांनी आता कंबर कसली असून, अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम प्रशासनाने दिला आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध