Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ जून, २०२६
आईच्या डोळ्यांसमोर वीज पडून मुलाचा दुर्दैवी अंत
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. राकेश रतिलाल पाटील (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून आईच्या डोळ्यांसमोरच ही घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राकेश पाटील हे आपल्या आई व काही मजुरांसह शेतात शेतीची कामे करत होते. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर वाढू लागल्याने शेतात उभी असलेली आपली दुचाकी सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी राकेश घाईघाईने निघाले. याचवेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. वीज कोसळण्याचा फटका इतका भीषण होता की राकेश यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी त्यांची आई व काही मजूर जवळील निंबाच्या झाडाखाली पावसापासून बचावासाठी थांबले होते. मुलाच्या अंगावर वीज पडल्याचे पाहताच आईने एकच आक्रोश केला. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विजेचा आघात अत्यंत तीव्र असल्याने राकेश यांच्या अंगावरील कपडे तसेच गळ्यातील रुमालदेखील जळून गेले होते. घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. राकेश पाटील हे मेहनती व कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे शहापूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. चार वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. सायंकाळी उशिरा शहापूर येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोक व्यक्त केला जात असून शेतकरी बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा