Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १४ जुलै, २०२६

९३ वर्षीय ज्येष्ठ गच्छस्थवीर ललितशेखर सुरीश्वरजी महाराजांच्या उपस्थितीत चातुर्मास सोहळ्याला.


वणी प्रतिनिधी :-
वणी शहरात जैन धर्मीयांच्या पवित्र चातुर्मास पर्वाला अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. ९३ वर्षीय ज्येष्ठ गच्छस्थवीर पूज्य ललितशेखर सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या पावन नेतृत्वाखाली साधू-साध्वींच्या भव्य संघाचे वणीत आगमन झाले. यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने त्यांचे अतिशय उत्साहात आणि भावपूर्ण स्वागत करण्यात आले.
​यानंतर वणी शहरात प्रमुख मार्गावरून भव्य 'वरघोडा' मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये 'जैन धर्म की जय' आणि 'महावीर स्वामी की जय' अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या पारंपरिक वरघोडा मिरवणुकीत महिला, पुरुष, तरुण आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. साधूमुनींच्या आगमनानंतर त्यांचा मुक्काम येथील जैन पाठशाळेत होता, त्यानंतर पारंपरिक विधींनुसार श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वनाथ तीर्थस्थळावर त्यांचा चातुर्मास प्रवेश सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
​वणी हे जैन सर्किटमधील एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. याच पार्श्वभूमीवर यंदाचा चातुर्मास सोहळा श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वनाथ तीर्थक्षेत्रावर होत आहे. या निमित्ताने गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश यांसह देशभरातील विविध राज्यांतून २५० ते ३०० जैन बांधव चातुर्मासातील उपवास, अखंड आराधना आणि धार्मिक साधनेसाठी वणीत दाखल होणार आहेत.
​पुढील चार महिन्यांच्या या कालावधीत हजारो भाविक या पवित्र तीर्थस्थळाला भेट देणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या सोहळ्यामुळे वणी शहराच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणात मोठी भर पडणार असून, येथील धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल, अशी भावना जैन समाजात व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध