अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात एका विवाहित महिलेला तिच्या पतीला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बलात्कारासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.
घरात कोणी नसताना धमकावल्याचा आरोप
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, पीडित महिलेला सानेनगर येथील आनंदा वसंत पाटील याच्या ओळखीने भाड्याने घर मिळाले होते. महिलेचे पती बाहेरगावी असल्याचा फायदा घेत आरोपी गेल्या दोन वर्षांपासून तिच्या घरी जात असल्याचा आरोप आहे. पती व मुलगा घरी नसताना आरोपी महिलेला प्रेमसंबंध असल्याचे पतीला सांगण्याची धमकी देत तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पती व मुलाला जीवे मारण्याची धमकी
तक्रारीनुसार, ९ तारखेला सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास महिलेचा मुलगा क्लासला गेला असताना आरोपीने तिला धमकावले. माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत, तर तुझ्या पतीला व मुलाला फाशी देऊन मारून टाकीन, अशी धमकी देत महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.
पती व भावाला सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार
घडलेल्या प्रकाराबाबत महिलेने तिच्या पतीला व भावाला माहिती दिल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ३५२, ३५१(४) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर)(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करीत असून, तपासातून पुढील बाबी स्पष्ट होतील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा