Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ जून, २०१९

शरद पवारांना मोठा धक्का; बारामतीचे पाणी माढ्याकडे वळवण्याचे आदेश


नीरा डाव्या कालव्याच्या वादात राज्य सरकारने थेट कृती करत बारामतीला जाणारे ६० टक्केपाणीहे माढ्याला देण्याचे आदेश काढले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार असे वक्तव्य केले होते. अखेर नवनिर्वाचित खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि  माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे महाजन यांनी आदेश काढले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांनी यापूर्वीच यावर नाराजी व्यक्त केली होती. आता ते कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. हा आदेश निघाल्याने सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे नियमबाह्य पाणी कायमस्वरूपी बंद होऊन फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना फायदा होणार आहे.  नीरा देवधर धरणातून 60 टक्के पाणी म्हणजेच सहा टीएमसी पाणी बारामती व इंदापूर तालुक्याला आणि  40 टक्के म्हणजेच पाच टीएमसी पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळत होते. आता सर्वच्या सर्व म्हणजेच तब्बल अकरा टीएमसी पाणी  फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळणार आहे. त्यामुळे बारामती भागातील शेतकऱ्यांचा आणि साखर कारखानदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.

राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर.

_____________________________________


यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी बुधवारी ही घोषणा केली. १ लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे मंगळवार (२६ जून) सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंती निमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यंदाचा हा पुरस्कार अण्णा हजारे यांना त्यांच्या सामाजीक क्षेत्रातील अमुल्य कामगिरीबद्दल देण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणाऱ्या एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणूनही त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले.

जम्मू कश्मीरमध्ये जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार, तीन जवान शहीद.

____________________________________


जम्मू कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केला असून या गोळीबारात तीन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या हल्ल्यात एक स्थानिक महिला देखील जखमी झाल्याचे समजते घटनास्थळी दहशतवादी व जवानांमध्ये चकमक अद्याप सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध