Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

दिंडोरी पोलिसांची कामगिरीघरफोडी करणारी गुजरात राज्यातील टोळी जेरबंद .





बापू चव्हाण दिंडोरी 

       दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्‍या गुजरात राज्यातील सराईत टोळीला जेरबंद करण्यात दिंडोरी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या दहा दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली तवेरा गाडी जप्त केली आहे.
दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथील फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील झाडावरून छतावर प्रवेश केला.त्यानंतर छताचे सिमेंटचे पत्रे खोलून घरात प्रवेश करत कपाटातील २५ हजार रुपये रोख आणि सुमारे 4 तोला सोन्याचे दागिने (नेकलेस, पोत व कुडते) असा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली. 
    सदर घरफोडी गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील टोळीने केल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे दिंडोरी पोलिसांच्या पथकाने थेट गुजरात गाठले. वलसाड जिल्ह्यातील कपराडा आणि धरमपूर तालुक्यात छापे मारून हितेश मगनभाई दारोठीया (३१,रा.माणी,ता. कपराडा), रणजीत करसन भोया (२९, रा माणी,ता.कपराडा), जयंतीभाई दामजभाई दळवी (२२ रा.मोठी कोरवाळ,ता.धरमपूर), सालेभाई सोमल्या दळवी (30, रा. मोठी कोरवाळ, ता. धरमपूर), रमन काकडभाई दळवी (२२,रा.मोठी कोरवाळ,ता.धरमपूर), या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. संशयितांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी गुजरातहून तवेरा गाडीने (जीजे १५ बीबी १७५०) दिंडोरीतील रनतळे शिवारात आले होते.गाडी आडोशाला लावून ते पायी डमाळे वस्तीत गेले व चोरी करून पसार झाले होते. पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि तवेरा गाडी जप्त केली आहे. ही कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.डी. एस.स्वामी,अपर पोलीस अधीक्षक एम. विमला,उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे,पो.हवा.अमोल साळवे,विश्वनाथ काकड,प्रदिप शिंदे,कमलेश देशमुख,विजय कोरडे,दिलीप राऊत,प्रकाश गायकवाड,विशाल पैठणकर, राहुल जोपळे,ललीत जाधव तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पो.हवा.हेमंत गिलबीले व प्रदिप बहिरम यांच्या पथकाने केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध