प्रतिनिधी उस्मानाबाद :(विशाल डूकरे)
उस्मानाबाद,दि.26:- जून 2019 पासून शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून स्कूल बस नियमावली -2011 अन्वये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बस मधूनच करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक ही स्कूल बस मधूनच व्हावी. अवैध वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, ही गंभीर स्वरुपाची बाब असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास याबाबतची सर्वस्वी
जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, वाहनमालक व शिक्षण विभागाची राहील.
तसेच परिवहन विभागाने स्कूल बसेस सुरक्षाविषयक तरतुदीचे पालन काटेकोरपणे होण्याच्या दृष्टीने नूतनीकरण नसलेल्या वाहनांच्या मालकांना वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करुन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ज्या स्कूल बस वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण झाले नाही,अशा वाहनांना दिलेला परवाना निलंबित / रद्द करण्याची कारवाई सुरु आहे.
स्कूल बस व्यतिरिक्त इतर अवैध वाहनातून विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही, या बाबतची दक्षता शालेय परिवहन समिती व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. गजानन नेरपगार यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा