नाही जायचयं मला शेवटचा हट्ट आहे माझा,
काहीच नाही मागणार तुला खरचं रे बाबा
नको मला खाऊ, नको मला काही
फक्त तुझा गोड गोड पापा दे त्यातच सारं काही
तुला नाही मला पाठवायचयं,मला सारं समजतयं
समाजाची रीत म्हणून लग्न लावून तु देतोय.
जुने फोटो बघून का तू इतकं रडतोय,
माझी छोटी बाहुली उराशी घेऊन हुंदके तू देतोय.
जुनी अडगळीतली खेळणी काढून का तू परत ठेवतोय,
रडका चेहरा लपवून का तू माझ्यासोबत हसतोय.
माझं चुकलयं का काही तू मला पाठवतोय,
लेक परकं धन का सारखं तू म्हणतोय.
आपलं घरं म्हण तू म्हणायला मला शिकवलंयं,
तुझं घर आता ते सांगत क्षणात परकं करतोय.
झोप गाढ लागली तरी डचकून जाग येते,
लांब जायचयं तुला सोडून जाणीव मला होते.
सतत सांगतो राहयचयं तिकडे पण तुला सुखात,
न रडता सांगना लागेन का तुझं तरी मन माझ्याविना घरात.
पत्रिकेवरचं नावही शेवटचं तुझ्यासोबत असणारं,
नाव ही माझं आता तुझ्या नावापासून वेगळं होणारं
केस कापायला तू मला न्यायचास,
लांब केस छान दिसतात तूच मला आता सांगतोस.
जीन्सची आवड तुला तू माझ्यासाठी घेऊन यायचा,
नाही ना रे आवडत मला साडी का तू घेऊन येतोस बाबा.
स्वयंपाक नको करायला लावू भाजेन तिला सांगायचा तू आईला,
बाळा थोडं तरी शिकत जा सांगतो तू आता रोजच मला.
कमी मार्क्स पडले की मी प्रगतीपुस्तक लपवत असे,
तुझी लेक खूप शिकेन विश्वास तुला नेहमीच असे.
तुझ्या गाडीचा आवाज ऐकून कोण आता दारात पळत येईन,
खाऊ आता घरी रोज कोणासाठी तू नेशीन.
हट्ट तुझ्याइतके आता कोण माझे पुरवणार,
लेक माझी लाडाची कोण आता म्हणणार.
डोक्यावरून माझ्या प्रेमाने हात कोण आता फिरवणार,
मायेनी मला आता कोण रे जवळं घेणारं
संपवू कशी रे कविता तू त्यात मावतचं नाहीयेस,
तुझं अस्तित्व लिहिताना शब्दच माझे संपत नाहीयेत....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा