Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

श्रीक्षेत्र नागेश्वर येथे चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न


शिरपूर:प्रतिनिधी:श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान च्या वतीने नागेश्वर अजनाड बंगला येथे प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा, किर्तन, महाप्रसाद वाटप असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. चार दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रम मुळे श्री नागेश्वर परिसरात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. 

दररोज सकाळी विविध अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे झाले, परमपूज्य सखाराम महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते कलशरोहण सोहळा, प्राणप्रतिष्ठा कलश रोहण तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, सायं पूजन, आरती असे विविध कार्यक्रम झाले.परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्यजी महाराज (श्री हरिहर चैतन्य धाम भांबरवाडी यांच्या तीन दिवस चाललेल्या किर्तनाला हजारोंच्या संख्येने भाविक तल्लीन झालेले दिसून आले. 

यावेळी श्री नागेश्वर सेवा संस्थान चे अध्यक्ष तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, श्री नागेश्वर सेवा संस्थान चे सर्व ट्रस्टी, शिरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, पंचक्रोशीतील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार दिवस श्री नागेश्वर परिसरात संपूर्ण तालुक्यातून तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने विविध कार्यक्रमात सहभागी झालेले दिसून आले.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय प्रभात प्रबोधनकार डॉ. किमयाताई आमले यांनी तसेच कार्यक्रमाचे सलग तीन दिवस परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्यजी महाराज यांचा गीता रामायण सत्संग व दिपोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आपल्या सुंदर किर्तनाने त्यांनी हजारो जनसमुदायाला मार्गदर्शन करून आपापसात कोणताही भेदभाव न करता प्रेमाने जीवन व्यतीत करावे असे आवाहन केले.श्री नागेश्वर सेवा संस्थान चे अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी तिनही दिवस वेळी किर्तनकार परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्यजी महाराज यांचा सन्मानपत्र व प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. प्रास्ताविक सुभाष कुलकर्णी यांनी केले.भूपेशभाई पटेल यांनी देखील भावनात्मक मनोगत व्यक्त केले.  

गेली चार दिवस श्री नागेश्वर येथे विविध धार्मिक कार्यक्रमातून भक्तगणांनी दिलेला प्रतिसाद व अनेक साधू संत कीर्तनकार महाराजांनी दिलेला आशीर्वाद यामुळे भुपेशभाई पटेल हे आनंदी व भावूक झाल्याचे दिसले.दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गेल्या आठवड्यापासून भूपेशभाई पटेल व सर्व पदाधिकारी यांनी भव्य दिव्य अशा या नेत्रदीपक धार्मिक सोहळ्याच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.भुपेशभाई पटेल यांनी मोठ्या प्रमाणात चमत्कार करून श्री नागेश्वर परिसराला वेगळे रूप प्राप्त करून दिले. 

निसर्गरम्य, नयनरम्य या परिसराला भुपेशभाई यांनी महाराष्ट्रातील आगळेवेगळे पर्यटन स्थळ तयार करून दिले आहे. येथे अनेक मंदिरांचे नवनिर्माण करून तसेच श्री नागेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारा सह परिसराचा कायापालट करून त्यांनी या परिसराला आगळे वेगळे स्थान निर्माण करून दिले आहे. अनेक ठिकाणाहून शैक्षणिक सहली श्री नागेश्वरला येत असून विद्यार्थी मनमुराद आनंद लुटतांना या ठिकाणी दिसून येत आहेत.

श्रीक्षेत्र नागेश्वर येथे भूपेशभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले असून या ठिकाणी नव्याने श्री गणपती मंदिर, पार्वतीमाता, श्री शंभू महादेवाचे मंदिर, श्री गुरुदत्त, श्री ऋषि महाराज, श्री हनुमंत, मोती माता मंदिर निर्माण करण्यात आले असून या सर्व मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा धार्मिक सोहळा संपन्न झाला.या विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी परमपूज्य राष्ट्रीय संत लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्य जी महाराज, परमपूज्य सखाराम महाराज अमळनेरकर, परमपूज्य ह.भ.प. महेश महाराज भागवताचार्य बभळाज, परमपूज्य डॉ. किमयाताई आमले राष्ट्रीय युवा प्रबोधनकार शिरपूर यांच्या वतीने कार्यक्रमात भक्त गणांसाठी मोठी धार्मिक मेजवानी मिळाली.दि. 24 ते दि. 27 फेब्रुवारी या कालावधीत कार्यक्रम संपन्न झाले. गुरुवारी शेवटच्या दिवशी हजारो भाविक यांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घेतला.सर्व कार्यक्रम श्री नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध