Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २० जुलै, २०२०

जैताणेच्या निवृत्ती शेलारने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घातली यशाला गवसणी; 95.2 टक्के गुण मिळवत स्मिता पाटील पब्लिक स्कुलमधून प्रथम क्रमांक, तर गणितात 100 पैकी 100 गुण..!



धुळे प्ररतिनिधीसचिन वाफेकर  

निजामपूर (ता.16):माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील निवृत्ती रवींद्र शेलार ह्या विद्यार्थ्याने दहावीच्या सीबीएसई परीक्षेत दहिवद (ता.शिरपूर) येथील स्मिता पाटील पब्लिक स्कुलमधून 95.2 टक्के (476/500) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे त्याने गणितात 100 पैकी 100 गुण मिळविले. काल (ता.15) जाहीर झालेल्या दहावी सीबीएसई परीक्षेच्या ऑनलाइन निकालात प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने संघर्षातून यशाला गवसणी घालत जैताणेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला!

तिसरीत असताना बालवयातच पितृछत्र हरपलेल्या निवृत्तीचा सांभाळ त्याच्या शेतकरी आजी-आजोबांनी केला. येथील शांतिनिकेतन शिशु संस्कार केंद्रात त्याचे पूर्वप्राथमिक, आदर्श प्राथमिक विद्या मंदिरात प्राथमिक,साक्री येथील प्रचिती इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये पाचवी, सहावीपर्यंतचे,तर सातवीपासून दहिवद येथील स्मिता पाटील पब्लिक स्कुलमध्ये त्याने माध्यमिक शिक्षण निवासी राहून पूर्ण केले.

बारावीनंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्यात प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. वाघाडी खुर्द (ता.शिंदखेडा) येथील निर्मलाबाई जाधव, गिरीधर जाधव व जैताणे (ता.साक्री) येथील शांताबाई शेलार यांचा तो नातू, तर दिपाली जगदाळे व प्रा.भगवान जगदाळे यांचा तो मानसपुत्र आहे. त्याला जाधव व जगदाळे परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.नातेवाईकांसह स्मिता पाटील पब्लिक स्कुलचे संचालक मंडळ व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध