Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

गो ग्रीनच्या ध्यासाला मध्य रेल्वेची साथ शेगाव रेल्वे स्टेशन परिसर हिरवाईने नटणार




शेगाव ( प्रतिनिधी उमेश राजगुरे) स्थानिक गो ग्रीन फाउंडेशनने 'हरित संतनगरी शेगाव चा ध्यास घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या मदतीने शेगाव रेल्वे स्टेशन  परिसर हिरवाईने 
नटवण्याचा संकल्प सोडला आहे.

याअंतर्गत शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात सुमारे 15 हजार स्क्वेअर फूट जागेवर बहुउद्देशीय पर्यावरण पूरक प्रकल्पाचा शुभारंभ आज स्थानिक मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनाने करण्यात आला. 

याबाबत सविस्तर असे की, स्थानिक गो ग्रीन फौंडेशननें एप्रिल 2019 मध्ये स्थापनेपासून तर आजपर्यंत संतनगरी शेगाव व परिसरामध्ये वृक्षारोपण, मियावाकी वन निर्मिती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्थानिक प्रशासनाने केलेल्या वृक्षारोपणाची निगा राखणे, पर्यावरण विषयक जनजागृती यासह अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबवून संपूर्ण  शेगाव शहर हिरवळीने सजवण्याचा ध्यास घेतला आहे. आपल्या कार्याने व पर्यावरण विषयक तळमळीने फाउंडेशनने स्थानिक नागरिकांची मने जिंकली असून फाउंडेशनच्या पर्यावरण विषयक उपक्रमांत शहरातील सर्व स्तरातील नागरिक व व स्थानिक प्रशासन उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. फाउंडेशनला श्रमदान, समयदान तसेच आर्थिक स्वरूपात योगदान देत आहेत.

फाउंडेशनची पर्यावरण विषयक तळमळ पाहून स्थानिक रेल्वे प्रशासनानेदेखिल मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून स्थानिक रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल 15 हजार स्क्वेअर फूट जागा पर्यावरण पूरक उपक्रमासाठी गो ग्रीन फाउंडेशनला  दिली आहे. सदर जागेवर फाउंडेशनच्यावतीने मियावाकी वन निर्मितीनिर्मितीसह  भविष्यात विविध पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सदर प्रकल्पाचे भूमिपूजन आज शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक श्री.प्रकाश पुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री यशवंतराव बुरुंगले तर  प्रमुख अतिथी म्हणून श्री. ज्ञानेश्र्वरदादा पाटील,शरदशेठ अग्रवाल रविकांत दादा पाटील,पांडुरंग बूच, दीपक दादा ढमाळ, डॉ. अभय गोयनका, नंदू भाऊ गणोरकर, तुळशीराम कलोरे, दिनेश शिंदे, कृष्णा भाऊ पिसे तसेच शेगाव रेल्वे स्टेशनचे  परिवहन निरीक्षक  श्री. मोहन देशपांडे, आर.पी.एफ .ठाणेदार श्री आर. के. मीना व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
"गो ग्रीन फौंडेशन व मध्य रेल्वेच्या सहभागाने शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात साकार होणारा हा पर्यावरण पूरक प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपी मॉडेलचे एक उत्कृष्ट उदाहरण असेल. गो ग्रीन फाउंडेशनची पर्यावरण विषयक तळमळ पाहून  या उपक्रमासाठी जागेसह पाणी व इतर अनुषंगिक सुविधा  उपलब्ध करून देण्यास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाने परवानगी दिली आहे. गो ग्रीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांची पर्यावरण विषयक आस्था पाहता देशभरातील रेल्वे प्रशासनासाठी हा प्रकल्प पथप्रदर्शक ठरेल याची आम्हाला खात्री आहे. तेव्हा गो ग्रीन फाऊंडेशनने या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी स्वतःला झोकून द्यावे." असे मत यावेळी स्टेशन प्रबंधक श्री . प्रकाश पुंडकर यांनी व्यक्त केले.

गो ग्रीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे पर्यावरणप्रेम मी वर्षभरापासून अगदी जवळून पाहत असून  त्यांच्या तळमळीने मी भारावून गेलो आहे, असे मत व्यक्त करून श्री. रविकांत दादा पाटील यांनी गो ग्रीन फाउंडेशनला वृक्षारोपणाचे कार्य सुलभ व्हावे यासाठी अर्थ ऑगर (खड्डे खोदणारी मशीन) या प्रसंगी भेट दिली. तसेच श्री तुळशीरामजी कलोरे यांनीदेखील फाऊंडेशनच्या कार्यासाठी अकरा हजार रुपये रोख स्वरूपात दिले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून शेगाव रेल्वे स्टेशन परिसर हिरवाईने नटविण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी रेल्वे प्रशासन आपल्यापरीने मदत करणार आहेच. तथापि या प्रकल्पासाठी पुढील टप्प्यात सुमारे चार  लाख रुपये खर्च अंदाजीत असून याकामी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी फाउंडेशनला सहकार्य करावे  व व शेगावकरांचे पर्यावरणप्रेम रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यास मदत करावी, असे आवाहन यावेळी गो ग्रीन फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले.

यावेळी फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक करून, आम्ही फाउंडेशनच्या सर्वच पर्यावरण पूरक उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनच्या पाठीशी उभे असल्याची भावना सर्वच मान्यवरांनी व्यक्त केली.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध