Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०

बिळात दडलेला वाघ पोलिसाना कसा सापडत नाही, त्याला वाघ म्हणावं की,मांजर...!


फरारी विकास वाघ याच्यावर,पोलीस दलातून निलंबनाची कारवाई...

अहमदनगर दि.13 अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेला नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हेशाखेत कार्यरत असलेला विकास वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलामार्फत पाठवण्यात आलेल्या अहवालानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी वाघ यांचे पोलीस दलातून निलंबन केले आहे.
नगर शहरात राहणाऱ्या एका तरुणीला रिव्हाल्वरचा धाक दाखवून व मारहाण करत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी वाघ यांच्या विरोधात 29 सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.गुन्हा नोंद झाल्यापासून वाघ फरार झाला आहे.

तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच 'ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील' अशी धमकी दिली. त्यानंतर विकास वाघ याने पीडितेवर वेळोवेळी कधी हॉटेल तर कधी कोतवाली पोलीस निरीक्षकाच्या निवासस्थानी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि गर्भपात केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब विकास वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली. तसंच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. 

त्यानंतर 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून विकास वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे हे तपास करत आहेत.हा वाघ मात्र पोलिसांना अद्यापपर्यंत कसा सापडेना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध