Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

शहीद वामन पवार अमर रहे , शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार ! ! !



उस्मानाबाद (राहुल शिंदे)दि.2 जिल्ह्यातील टाकळी ता.परंडा गावचे सुपुत्र जवान वामन मोहन पवार हे भारतीय सैन्य दलात भारत- चीन सीमेवर लडाख येथे कर्तव्यावर असताना 28सप्टेंबर रोजी अपघाती निधन होऊन वीरमरण आले होते. यानंतर पार्थिव पुणे येथे विशेष हेलिकॉप्टरने आले व तेथून मोटारी मार्गे मूळ गावी आले.व काल गुरुवारी शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारतमातेच्या या वीर सुपुत्रास अखेरची मानवंदना देण्यासाठी असंख्य जनसमोदाय कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून उपस्थितीत होता.हे 44 आर. आर. बी. एन राजपूत बिग्रेडमध्ये कार्यरत होते.

यावेळी संपूर्ण परंडा तालुक्यासह परिसरातील नागरिकांनी वामन पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी ‘शहीद वामन पवार अमर रहे’, ‘परत या परत या’ ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ या घोषणा उपस्थितांनी दिल्या. आप्तांचा आक्रोश वातावरणातील शांतता भंग करत होता. तर अनेकांच्या डोळे डबडबले होते. वामन पवार यांना यावेळी उपस्थितांनि श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

वामन पवार हे 17 वर्षांपूर्वीच सैन्यात भरती झाले होते. पवार कुटुंबातील पहिलाच मुलगा शासकीय सेवेत होता. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, चार वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांचा मुलगा आणि विवाहित एक भाऊ-बहिण असा परिवार आहे.

त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरीच आहे. वामन यांचे प्राथमिक शिक्षण आश्रम शाळा लांबोटी येथे तर माध्यमिक शिक्षण बार्शीतील काटेगाव येथील महात्मा गांधी हायस्कूल मध्ये झाले. ते सन 2003मध्ये सैन्यात भरती झाले होते.

परंडा तालुक्याच्या इतिहासात सैन्य दलातील जवानाला वीरमरण येण्याची ही दुसरी वेळ असल्याचे समजते.डिसेंबर 2019 मध्ये मुगाव येथील वैभव बालाजी गवंडी पंजाब बॉर्डरवर शहीद झाले होते.

तमाम भारतीयांना त्यांच्या बलिदानाचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध