Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी - देवकन्या मैंदाड, पोलीस उपनिरीक्षक उस्मानाबाद


   स्री शक्तीचा गौरव करणारा नवरात्रोत्सव यावर्षी कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणे साजरा होत आहे.तरुण गर्जना नवरात्रोत्सव स्पेशल ''जागर नवदुर्गाचा,सन्मान स्री शक्तीचा'' अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात आपल्या कर्तुत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नवदुर्गाचा परिचय आपण करून घेणार आहोत.

 विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे उस्मानाबादच्या पोलीस उपनिरीक्षक 
सौ.देवकन्या मैंदाड मराठवाड्यातील अंबाजोगाई येथे दामिनी पथक प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या व उल्लेखनीय कार्य पार पडलेल्या महिला अधिकारी होत.मूळच्या कळंब तालुक्यातील चोराखळी येथील असणाऱ्या देवकन्या मॅडम यांची सन 2015 मध्ये महाराष्ट्र पोलीस सेवेत नियुक्ती झाली. एक शिस्तप्रिय, निष्ठावान व कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख आहे.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चोराखळी ता. कळंब या छोट्याशा गावात झाले.आई-वडील दोघेही शेतकरी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती.. बारावीला चांगले मार्क मिळाल्यामुळे लवकर नोकरी लागावी या आशेने डीएड करण्याचा निर्णय घेतला. पण शिक्षक भरतीच शासनाने बंद करून टाकली.. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बी ए ला ऍडमिशन घेऊन प्रथम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला.त्याच दरम्यान  विवाह झाला.. विवाहानंतरही अभ्यासामध्ये सातत्य ठेवले.. 2012 ला ग्रॅज्युएशन पूर्ण झाले त्याच वर्षी पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा दिली... जुलै 2013 ला रिझल्ट लागला आणि एनटीसी प्रवर्गात संपूर्ण महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.. पुढे एक वर्षाचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पूर्ण करून पहिली पोस्टिंग बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे झाले.... 

आंबेजोगाईला मराठवाड्याचे पुणे म्हटले जात असल्याने त्या ठिकाणी शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मुली येतात... तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी आंबेजोगाई तालुका दामिनी पथक प्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली.. पुढील तीन वर्ष याठिकाणी दामिनी पथक प्रमुख म्हणून कार्यरत राहिले.. यादरम्यान संपूर्ण जिल्ह्यात उत्कृष्ट कार्याबद्दल औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक  मिलिंद भारंबे यांच्या हस्ते सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले...

पोलिस प्रशासनात महिला अधिकारी म्हणून देवकन्या मैंदाड यांनी आपली वेगळी ओळख अंबाजोगाईत निर्माण केली आहे. एक धाडसी व डॅशींग अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा आहे. 

अंबाजोगाईत रोडरोमिओ त्यांची धास्ती घेतात असा दरारा त्यांनी निर्माण केला आहे.तर हरवलेल्या, सोडून दिलेल्या 11 मुलांचा शोध त्यांनी घेतला. या बद्दल मुस्कान पथकाच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांचा जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार झालेला आहे.गेल्या दोन  वर्षापासुन एक महिला अधिकारी म्हणून त्यांच्या उल्लेखनिय कार्याची प्रेरणा नविन तरूणींसमोर प्रेरणादायी ठरणारी आहे.साध्या त्या जून 2019 पासून पोलीस अधिक्षक कार्यालय उस्मानाबाद येथे कर्तव्यबजावत आहेत.

✍️शब्दांकन:- राहूल शिंदे, उस्मानाबाद (9975114800)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध