Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ ऑक्टोबर, २०२१

धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू जिल्हाधिकारी जलज शर्मा : रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी लाभ घ्यावा



धुळे, : धुळे शहराच्या मध्यवर्ती भागात (साक्री रोड) असलेले धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि सीटी स्कॅनसह अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. सदरचे रुग्णायल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयातील सोयी सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय चक्करबर्डी परिसरात स्थलांतरित झाले आहे. त्या बरोबरच धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयात महिला व मुलांसाठी प्रत्येकी 100 खाटांचे रुग्णालय मंजूर आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी वरील आवाहन केले आहे. 
या रुग्णालयात जनरल फिजिशियनसह हृदय, छाती, त्वचा, स्त्री, बालरोग, अस्थीरोग, कान नाक घसा, नेत्र रोग, भूल तज्ञ, मनोविकार तज्ञ, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फॉरेन्सिक या सुविधा तज्ज्ञांसह उपलब्ध आहेत. मागील वर्षी 
सीटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच क्ष-किरण (एक्स- रे), रक्त, लघवी तपासणीसाठी सुसज्ज प्रयोग शाळा उपलब्ध आहे. 

सदरचे रुग्णालय धुळेकरांसाठी मध्यवर्ती ठिकाणी आहे. मुख्य बसस्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. या रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागाची वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक अशी आहे. या रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्पही कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच कोविड- 19च्या दुसऱ्या लाटेत रुग्णांसाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे महानगरपालिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सिजनयुक्त 60 खाटा अद्ययावत करण्यात आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयातील सोयीसुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी केले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध