Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

साक्रीच्या नगरपंचाय निकाला नंतर मृत मागासवर्गीय महिला प्रकरणात शहराचा तापलेल्या वातावरणाची परिणिती काय होणार ?



धुळे प्रतिनिधी - जिल्ह्यातील साक्री तालुका हा नगर पंचायत निवडणूक निकाल व त्या नंतर झालेल्या एका मृत्यू अर्थात खुनाच्या घटनेमुळे खूपच तापला आहे.या निमित्ताने धुळे व नंदुरबार दोन्ही जिल्ह्यांचे राजकारण ढवळून निघाले आहे. 

सर्वात पहिली व महत्वाची बाब म्हणजे कोणत्याही राजकरणासाठी, कोणत्याही निवडणूकीसाठी, कोणत्याही सत्तेच्या खूर्ची साठी कुणाचा जीव जाणे , कुणाचा खून होणे ही बाब केव्हाही समर्थनीय ठरणार नाही.मानवी जीव हा अशा छप्पन निवडणूका व छप्पन निकालां पेक्षा श्रेष्ठ आहे.साक्रीच्या निवडणूक निकाल विजय रॅलीच्या पार्श्वभुमीवर दोन गटात झालेल्या हाणामारीत एका महिलेचा मृत्यू झाला. यावर एका गटाचा दावा आहे हा खून आहे.

दुसरा गट म्हणतो अपघाती अकस्माक निधन आहे.पोलिसांनी खुनाची कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांची ती जबाबदारीच आहे.तपासात पोलिस नेमके काय ते शोधून काढतीलच . सध्यातरी पोलिसांवर दोन्ही बाजूंनी बर्‍यापैकी दबाव आहे.शिवाय याबाबत वेगवेगळ्या मार्गाने आपापले म्हणणे ठाम ठसविण्यासाठी दोन्ही पक्ष विविध मार्ग अवलंबित आहेत.या मागचे कारण येत्या नगर पंचायत अध्यक्ष पदाच्या निवडणूक निकालाच्या दिवशी चमत्कार घडावा आणि घडू नये,यासाठी दोन्ही पक्ष रणनिती आखत आहेत.या रणनितीचा भाग म्हणूनच दोन्ही कडून वातावरण तापविले जात आहे. एकदा नगरपंचायत अध्यक्ष पदाची निवडणूक झाली,की हा मुद्दा थंड बस्त्यात जाईल.हे नव्याने सांगायाला नको.या खुनाच्या गुन्ह्यात अडकून काही सदस्य अध्यक्ष निवडीच्या दिवसा पर्यंत पोलिस कस्टडीत राहिले तर निकालात चमत्कार होण्याची बऱ्याच मंडळींना अपेक्षा आहे. साक्री मनपावर गेली चाळीस वर्ष नाना नागरेंचे वर्चस्व होते. आता त्यास धक्का लागला आहे . 

नाना नागरे मुळचे स्व. रामराव दादा पाटील यांच्या पठडीत तयार झालेले कार्यकर्ते होते.पण नंतर त्यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. ते इतके वाढले की एका विवाह समारंभात सुरेश रामराव दादा पाटील व नाना नागरेत एक फारच हॉट घटना घडली होती.ती सर्वत्र आजही लेकांच्या आठवणीत आहे.नाना नागरेंनी साक्रीतील लहान लहान दुर्लक्षित समाज आपल्या पाठीशी आणून इतकी वर्षे पकड मजबूत ठेवली होती.अधिक काळ सत्ता एका ठिकाणी राहिली,की तिचा दर्प तयार होतो. 

सतत सत्तेत असल्याने नानांच्या मुलांचे हायवे वरील हॉटेल्स व विविध व्यवसाय नागरिकांच्या बर्‍यापैकी लक्षात येत होते. विविध अधिकारी वर्ग येथे मुक्कामाला राहात असतात.हे अधिकारी नंतर कशी चक्री फिरवितात ही बाब साक्रीकर समजत नाहीत काय ? साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पवनउर्जा प्रकल्प आहेत.या प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण करणे व सोडविणे हे प्रकार नंदुरबार,साक्री मधून कोणकोण करतोय,याची माहिती नागरीक घेतच असतात.साक्रीत मोठ्या प्रमाणावर नागरिक हे परिसरातील लहान लहान गावातून येवून स्थायिक झालेले आहेत.ते कोणत्या पद्धतीने विचार करतात.साक्रीचे मुळ भोसले परिवार आहे.

या भोसले परिवारातील इतर सदस्य अलिकडे अंतर राखून कां रहायला लागले ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचाही कुणी प्रयत्न केला नाही.साक्रीकर निवडणूकात नेहमीच चमत्कार करतात.काँग्रेस मधून भाजपात केवळ अर्धा तास आधी प्रवेश करून आमदारकीची उमेदवारी भरणाऱ्या स्व.गो.शि.चौधरींना भाजपाचे काहीच अस्तित्व नसताना साक्रीकरांनी निवडून दिले होते.साक्रीकरांनी आरपीआयचा आमदार असाच निवडून दिला होता . 

गेल्या वेळेस तर सौ मंजूळाताई तुळशीराम गावित या मुळ भाजपेयी उमेदवार अपक्ष उभ्या राहिल्या व विविध मंडळींनी एकत्र येत त्यांना निवडूनही आणले होते. नंतर त्या सत्तेतल्या शिवसेनेशी जुळल्या. नाना नागरे व चंद्रकांत रघुवंशी यांचे त्यात योगदान आहे.साक्रीकरांची भुमिका फार वेगळी असते.नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व नाना नागरेंचे सख्य जगजाहिर आहे.या संबंधा पुरता त्यांचा साक्रीतला सहभाग साक्रीकर समजू शकतात.परंतू या निवडणुकीत सबकुछ चंदुभय्या,ही बाब देखील साक्रीकरांना खटकली. म .वि .आ. तील काँग्रेसला अंडर इस्टिमेट करण्याचेही नुकसान नागरेंना उठवावे लागले.खुद्द नाना नाग रें च्या शिवसेना व राष्ट्रवादीतली किती मंडळी रात्री उशिरा भाजपा वाल्यांच्या कानास लागत होती व खाच खळग्यांचे मार्गदर्शन करीत होती, ही बाब त्यांनी आत्मसंशोधन करण्याची आहे . पाणी हा अनेक मुद्यांपैकी एक होता. त्यापेक्षा सत्तेच्या दर्पाने त्यांचे अधिक नुकसान केले आहे.साक्री तालुक्याचे एक वैशिष्ठ्य आहे. 

येथील माणसे कुठल्याही पक्षात असली तरी त्यांच्या अंतर्मनात एक कॉम्रेड सतत जागता असतो.त्यांना कुठली अमिषे फार भुलवू शकत नाहीत.ही मंडळी एका मर्यादेच्या पलिकडे कुणाचे वरचढ होणे ऐकूनही घेत नाहीत.आणि एकदा काही ठरले,की शहरभर व तालुकाभर अत्यंत वेगाने फटाफट तो विचार व्हायरल होतो . उलट भाजपात या आधी एकसंघ पणा नव्हता.मंडळी विखूरलेली होती.इतके दिवस विरोधकांचे हे विखुरलेपण ही देखील नाना नागरेंची शक्ती वाढविण्यास उपयोगी पडत होती. 

या वेळी मात्र स्थिती बदलली.ना.देवेन्द्र फडणवीस यांनी साक्रीची जबाबदारी अमरीशभाई पटेल यांच्यावर टाकली होती. अमरिशभाईंनी काही कमी पडू दिले नाही . खा.डॉ.सुभाष भामरे,खा.डॉ.हीना गावित आ. जयकुमार रावल अशा मंडळींनी व्युह रचना केली.भाजपाची विखुरलेली मंडळी एकत्र केली. बीज अंकुरण्यास जमीन आधिच तयार होती.धुळ्याचे अनुप अग्रवालांना त्यांनी कामास लावले. त्यांनीही गिरिषभु कडून आलेले व धुळ्यात वापरलेले फंडे साक्रीतही वापरले व साक्रीत शॉकिंग बदल घडला.आता एवढे झाले असले तरी साक्री नगरपंचायत अध्यक्ष पदाच्या निवडणूकिसाठी डावपेच सुर झाले आहेत.त्यात खुनासारखी अत्यंत गंभीर घटना घडल्याने वातावरण तापले आहे. धुळ्यात केवळ तीन नगरसेवकांवर भाजपाने सौ.मंजुळाताई गावितांना महापौर बनविण्याची खेळी खेळली होती . त्याचीच परतफेड साक्रीत केली जाणार आहे काय ? हा आज धुळे व नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड उस्तुकता पूर्वक विचारला जाणारा प्रश्न आहे .

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध