Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ मार्च, २०२२

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत.पण त्यांचे विमान पुण्यात उतरण्यापूर्वीच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर नामुष्की



पुणे प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत.पण त्यांचे विमान पुण्यात उतरण्यापूर्वीच महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या फेट्यावर वापरण्यात आलेली राजमुद्रा काढण्याची वेळ भाजपवर आणि महापौर मोहोळ यांच्यावर आली आहे.काँग्रेस आणि मराठा संघटनांच्या आक्षेप आणि विरोधानंतर ही राजमुद्रा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणेकरांच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गिरीश मुरुडकर यांच्याकडून मोदींसाठी खास असा शाही फेटा तयार करवून घेतला आहे.या फेट्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा चक्क ऑस्ट्रेलियन डायमंडपासून आणि सोन्याच्या वापरापासून बनवला आहे.
या फेट्याबाबत 'सरकारना'माशी बोलताना मुरुडकर म्हणाले,ऐतिहासिक पुण्यनगरीत येणाऱ्या पंतप्रधानांसाठी फेटा देखील ऐतिहासिक स्वरूपाचा असावा,यासाठी आम्ही फेट्याचे जवळपास २५ पॅटर्न पाहिले.त्यानंतर त्यांच्या कपड्याच्या विचार करुन आम्ही क्रीम विथ रेड कापडचा वापर केला आहे. तर फेट्यामध्ये अत्यंत उच्च दर्जाचे ऑस्ट्रेलियन डायमंड वापरण्यात आले आहेत. फेट्याच्या वरील बाजूस गोल्ड प्लेट लावली असून त्याला सोन्याचं पाणी दिले आहे.
 
याच फेट्याच्या मध्यभागात मोत्याच्या सूर्यफुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा बसविण्यात आली होती. पंतप्रधान मोदी यांना राज्यकारभार करताना सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण व्हावी यासाठी ही राजमुद्रा बसवण्यात आली होती. तर सूर्यफुलाचं वैशिष्टय म्हणजे, ते नेहमी तेजाकडे, सूर्याकडे पाहत असते, अशीच थीम घेऊन फेटा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते.याशिवाय उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रेशमी आणि कॉटनचे कापड वापरण्यात आले आहे. 

फेट्यामधून हवा आत-बाहेर जावी, त्यांना त्रास होवू नये, यासाठी मध्यभागात जाळी तयार केली आहे, असेही त्यांनी सांगितले होते. पण याच राजमुद्रेवर काँग्रेस आणि मराठा संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर ही राजमुद्रा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध