Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १७ जून, २०२२

शिरपूर : महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पत्रानुसार शिरपूर साखर कारखान्याबाबत निर्णय बहुराज्यीय कायद्यानुसार केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या मार्फतच होणार असल्याचे स्पष्ट केले



महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 13 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सहकार) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बहुराज्यीय साखर कारखाना आहे. कारखान्याचे कामकाज बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम 2002 नुसार चालत असून कारखान्याचे निबंधक हे केंद्रीय निबंधक नवी दिल्ली आहेत. कारखान्याचे कामकाज बहुराज्यीय कायद्यानुसार चालत असल्याने राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार कारखाना भाडेतत्त्वावर देण्याबाबत कार्यवाही करता येणार नाही. सद्यस्थितीत कारखाना बंद अवस्थेत असून धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने येणे कर्ज रकमेपोटी कारखान्याची मालमत्ता सरफेसी कायद्याअंतर्गत ताब्यात घेतली आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे की डॉ. जितेंद्र ठाकूर यांच्या समान आशयाच्या सहकार मंत्री यांना अग्रेषित केलेल्या पत्रास अनुसरून या कार्यालयाने 11.10.2021 रोजीच्या पत्रान्वये शिरपूर साखर कारखान्यावर प्रशासक नेमणे किंवा कारखाना भाडेतत्त्वावर देणे ही बाब महाराष्ट्र शासनाच्या या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे यापूर्वीच कळविले आहे.
या बाबत जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र पाटील म्हणतात की, डॉ. जितेंद्र ठाकूर आपण गेल्या अडीच वर्षांपासून निवडणूकित पराभूत झाल्यापासून गायब होते. शासनाला खोटेनाटे पत्रव्यवहार करुन व खोटी माहिती देऊन आपण जनतेची दिशाभूल करित आहात. कारखाना अवसायानात आहे की सुरु आहे तसेच कारखाना बहुराज्यीय आहे की राज्य शासनाच्या नियंत्रणात आहे हे सुद्धा आपणास माहित नाही. साखर कारखाना चेअरमन व संचालक मंडळ कारखान्याच्या अडचणींना सामोरे जाऊन सुरळीतपणे पत्रव्यवहार करत असून कारखाना सुरु करण्याच्या हालचाली करित आहेत. उठसूट धुळ्याला राहून खोट्या बातम्यांचा प्रसार व प्रचार करु नका. जनतेत गैसरमज, असंतोष निर्माण होईल असे पत्रव्यवहार करण्यापेक्षा समाज कार्यात हातभार लावून जनतेची सेवा होईल अशा प्रकारे काहीतरी पुण्याचे काम करा, असेही जि. प. सदस्य देवेंद्र पाटील म्हणाले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध