Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २५ जुलै, २०२२

पिंजरा पद्धतीतून बोरपाडाच्या शेतकरी गटाने केली मत्स्य पालनातून रोजगाराची निर्मिती..!



नंदुरबार प्रतिनिधी: आदिवासी विकास विभागातर्फे पिंजरा पद्धतीच्या मत्स्य पालनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरपाडा येथील सहा शेतकऱ्यांच्या गटाने पिंजरा पद्धतीचे मत्स्य पालन करीत रोजगाराची नवी वाट शोधली आहे. आदिवासी विकास विभागातर्फे भारतीय संविधान अनुच्छेद 275 (1) अंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना मत्स्यपालनासाठी पिंजरे पुरविणे, ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा या सहा सदस्य शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. 

या गटातील बहुतांश सदस्यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय असून त्याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हंगामी शेतीतून मिळणारे उत्पन्न अल्प. बोरपाडा गावालगतच रायंगण हा तलाव आहे.या तलावात वर्षभर पाणी असते.या तलावात मत्स्य पालनासाठी या सदस्यांनी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात संपर्क साधला.या कार्यालयाच्या वतीने त्यांना पिंजऱ्यातील मत्स्यपालनाविषयी माहिती मिळाली आणि या सदस्यांनी मत्स्यपालनाचा निर्धार केला.

मत्स्य पालन व्यवसायासाठी सहा जणांच्या गटाला केज कल्चर अर्थात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालन व्यवसायासाठी तरंगते सहा पिंजरे, मत्स्य बीज बोटुकली,खाद्य,बिगर यांत्रिकी बोट,यांत्रिकी बोट व प्रशिक्षणासाठी 23 लाख 66 हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदूरबार कार्यालयामार्फत मंजुरी देण्यात आली.

गटातील सदस्यांना पिंजऱ्यामध्ये मत्स्य बीज टाकून त्यांचे संगोपन कसे करावे, माश्यांचे चारा नियोजन, पिंजऱ्यांची स्वच्छता कशी करावी, लहान मासे व त्यांना झालेले आजार कसे ओळखावेत याबाबत या गटातील लाभार्थ्यांना नंदूरबारच्या मत्स्यव्यवसाय कार्यालयाच्या वतीने आय.सी.ए. आर.केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था सी. आय. एफ.ई.वर्सोवा,मुंबई येथे प्रशिक्षण देण्यात आले.प्रशिक्षणानंतर तलावात पिंजरे लावण्यात आले. 

चालू हंगामात एकूण सहा पिंजऱ्यांपैकी एका मध्ये 15 हजार पंकज जातीची बोटुकली सोडण्यात आली होती. त्यातील मासे मोठे झाल्यावर इतर पाच पिंजऱ्यात टाकण्यात आली.मत्स्य बीजासाठी 75 हजार रुपयांचा खर्च आला.माश्यांसाठी साधारणत: 8 टन इतके खाद्य खरेदी करण्यात आले. त्यासाठी 55 हजार रुपये टनाप्रमाणे एकूण 4 लाख 40 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला.दिवसातून दोन वेळेस पिंजऱ्यातील मत्स्यबिजांना खाद्य देणे, पिंजऱ्यांची साफसफाई करण्याची काळजी सर्व सभासदांनी घेतली. पिंजऱ्यांमधील मासे 500 ग्रॅम ते  1 किलो वजनाचे झाल्यावर गावात व स्थानिक व्यापाऱ्यांना 80 रुपये प्रती किलो दराने जागेवरच विक्री केली जाते गटामार्फत मासे विक्रीच्या व्यवहाराची दैनदिन नोंद ठेवण्यात येते. 

मस्य पालनातून साधारणत: नऊ टन उत्पन्न  त्यांना मिळाले त्यातून त्यांना खर्च वजा जाता 2 लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या मिळणाऱ्या उत्पनातून दरवर्षी प्रति पिंजरा 1 हजार रुपये प्रमाणे 6 हजार रुपयांचे वार्षिंक भाडे ग्रामपंचायतीला देण्यात येत असल्याने ग्रामपंचायतीला सुध्दा उत्पन्न मिळत आहे.

मत्स्यव्यवसायामुळे गटातील प्रत्येक सदस्यांला साधारण अंदाजे 50 हजार रुपयांपर्यंत नफा झाला. भविष्यात आणखी चांगल्या पद्धतीने मत्स्यपालन व्यवसाय करून जास्त उत्पादन कसे घेता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया गटातील सर्व लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. मत्स्यपालन व्यवसाय उपलब्ध करून दिल्याबद्दल एकात्मिक आदिवासी प्रकल्प नंदुरबार, मार्गदर्शक सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, नंदूरबार व केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, वर्सोवा या सर्वांचे लाभार्थ्यांनी आभार मानले आहेत. 

‘‘पिजऱ्यांमधून मत्स्य उत्पादनास सुरवात झाली आहे.या माशांना मागणी आहे.त्यांची विक्री स्थानिक व्यापारी, विक्रेते व गावातील नागरिकांना केली जाते.परिसरातील ग्रामस्थांना ताजे व स्वस्त दरात मासे मिळतात.’’
                                               -इंदास गावित, गट लाभार्थी, बोरपाडा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध