Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

मध्यप्रदेशात रुद्राक्ष घेण्यासाठी दोन किमी लांब रांगा ,२५ किमीपर्यंत वाहतूक ठप्प ; महाराष्ट्रातील एका महिलेचा मृत्यू...



लेवाजगत न्यूज भोपाळ – कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाममध्ये शिव महापुराण कथा व रुद्राक्ष वाटप महोत्सवाला सुरुवात झाली आहे.रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रमात सुमारे दहा लाख भाविकांची गर्दी झाली असल्याची माहिती समोर येत आहे.त्यामुळे इंदूर-भोपाळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.सुमारे २५ किलोमीटर जाम आहे.


गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.या धक्काबुक्कीत महाराष्ट्रातून आलेल्या ५२ वर्षीय मंगलबाई यांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिहोर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.दोन हजार लोक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

दहाहून अधिक महिला बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाम येथे गुरुवारी रुद्राक्ष वाटप महोत्सवास सुरुवात झाली.शिव महापुराण कथाही सुरू झाली आहे. मोठ्या संख्येने भाविक आल्याने भोपाळ-इंदूर महामार्गावर २५ किलोमीटर लांब जाम झाला होता. कुबेरेश्वर धाम ते चौपाल ,सागर भोपाळच्या दिशेने लांब जाम आहे. एवढा मोठा रस्ता जाम होऊनही भाविकांची ये-जा सुरूच होती.भोपाळ आणि इंदूर या दोन्ही ठिकाणचे लोक कुबेरेश्वर धामला पोहोचत आहेत. एवढ्या गर्दीमुळे रुद्राक्ष मिळवण्यात अपयशी ठरलेले लोक पंडित मिश्रांविरोधात घोषणा पण देत परतले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्सवस्थळी भेट रद्द केली आहे. महोत्सवात सुमारे दहा लाख लोक उपस्थित राहिल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

रुद्राक्ष घेण्यासाठी दोन ते तीन किमी लांब रांगा –

रुद्राक्ष वितरणासाठी चाळीस काउंटर उभारण्यात आले आहेत.गर्दी पाहता रुद्राक्ष वाटप एक दिवस आधी म्हणजेच बुधवारपासूनच सुरू झाले होते.पहिल्या दिवशी सुमारे दीड लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत पाच लाखांहून अधिक भाविकांना रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले आहे.गुरुवारी रुद्राक्षसाठी दोन ते तीन किलोमीटर लांब रांग होती.दोन लाखांहून अधिक लोक रांगेत उभे असल्याचा अंदाज आहे.गर्दी रोखण्यासाठी बांबू आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते,जे गर्दी रोखण्यात अपयशी ठरत आहेत.

एक दिवस आधी दोन लाख लोक आले होते –

कार्यक्रमाच्या एक दिवस आधी बुधवारी दोन लाखांहून अधिक लोक येथे पोहोचले.भाविकांची वाढती गर्दी पाहता कार्यक्रमस्थळी एक दिवसापूर्वीच भाविकांना रुद्राक्षाचे वाटप सुरू करण्यात आले.गुरुवारी आठ लाखांहून अधिक लोक पोहोचले आहेत.

मोबाईल नेटवर्कही जाम –

भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे पोलीस-प्रशासनाला बंदोबस्त करण्यात अडचणी येत आहेत.मोबाईल नेटवर्क जाम झाल्याने कुबेरेश्वर धाम येथे येणाऱ्या भाविकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध