Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ५ फेब्रुवारी, २०२३

घोडगावचा ' पियुष ' आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळणार



चोपडा प्रतिनिधी - तालुक्यातील घोडगाव येथील पियुष अविनाश भोई हा नेपाळ येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाकडून खेळणार आहे.मे महिन्यात ही स्पर्धा नेपाळ येथे होणार आहे.
पियुष हा चोपडा येथील एस एन आर जी इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये प्राथमिक शिक्षण घेत असताना त्याला सैय्यद सर यांनी त्याच्यातील गुण हेरून त्याला फुटबॉल, क्रिकेट,कराटे, थाळीफेक या खेळाचे प्रशिक्षण दिले, माध्यमिक शिक्षण सी बी निकुंभ हायस्कुल घोडगाव येथे पूर्ण करताना खेळाचा सराव सुरु ठेवला. 

यावेळी त्याला वडील सी बी निकुंभ हायस्कुल घोडगाव येथील शिपाई अविनाश भोई यांच्यासोबत शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी फुटबॉलच्या सरावासाठी प्रोत्साहन दिले.तसेच खेळाच्या पुढील प्रशिक्षणाची सोयही करून दिली. कनिष्ठ आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत खेळल्यानंतर ओपन नॅशनल चॅम्पियनशिप २०२३ साठी महाराष्ट्र शांती खेळ संघ जळगाव तर्फे जळगाव येथील पी.एच.पाटील इंग्लिश मेडीयम शाळेत जिल्हास्तरीय निवड चाचणीत उत्तीर्ण झाल्यावर महाराष्ट्राच्या संघात निवड झाली.स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (साई) शी संलग्न असलेल्या १९ वर्षाखालील ५व्या ओपन नॅशनल चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धा दि २८ ते ३० जानेवारी रोजी मथुरा (उत्तर प्रदेश) येथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या यात महाराष्ट्रातील स्पर्धकांनी घवघवीत यश मिळवले येथे फुटबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण पदक मिळवले.यात खेळाचे नैपुण्य व कौशल्य दाखवत भारतीय संघात पियुषची निवड करण्यात आली. 

यावेळी महाराष्ट्राच्या टीमचे व्यवस्थापक योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाने खेळात सुधारणा केली. पियुष हा भारतीय संघाकडून १९ वर्षाखालील पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी नेपाळ येथे खेळणार आहे. या यशाबद्दल पियुष व अविनाश भोई परिवाराचे नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी, उपाध्यक्ष द्रविलाल पाटील,सचिव जवरीलाल जैन व संचालक मंडळ यांच्यासोबत सी बी निकुंभ हायस्कुलचे मुख्याध्यापक आर पी चौधरी, पर्यवेक्षक व्ही ए नागपुरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध