Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ जुलै, २०२३

धुळे येथील कनोसा कॉन्व्हेंट मध्ये दलालांचा सुळसुळाट पालकांची फसवणूक, प्रवेशाच्या नावाखाली आर्थिक लूट ? युवा सेनेसह पालकांची पोलिसात धाव......!!



धुळे प्रतिनिधी :- धुळे कनोसा कॉन्व्हेंट मध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली काही दलालांकडून पालकांची फसवणूक होत असून त्या माध्यमातून पालकांची आर्थिक लूट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई च्या मागणी करिता पालकांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे.याबाबत काही दलालांना फोन पे च्या माध्यमातून पैसे पाठवल्याचे पुरावे देखील पालकांनी अप्पर पोलीस अधीक्षकांना दिले आहे. याप्रकरणी संबंधिता विरोधात गुन्हे दाखल करून मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी पालकांसह युवा सेनेने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात येईल असे आश्वासन पालकांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.


मागील अनेक दिवसांपासून साजिया सलामुद्दिन काझी या महिलेकडून कनोसा कॉन्व्हेंट मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या नावाखाली अनेक पालकांची आर्थिक लूट करत फसवणुक होत असल्याचा प्रकार समोर आला होता.याबाबत पालकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने पालकांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे कैफियत मांडून सदरच्या प्रकरणात पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेट चा समावेश असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख हरीश माळी,युवा सेना उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, मनोज माळी, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, विधानसभा प्रमुख योगेश मराठे, सिद्धेश नाशिककर, जयेश फुलपगारे ,शुभम फुलपगारे, संदीप बडगुजर, रोहित अमृतकर यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धुळे येथील कनोसा कॉन्व्हेंट मध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली पालकांची होत असलेली आर्थिक लूट व फसवणूक हा धक्कादायक प्रकार असून सदरचे रॅकेट उध्वस्त करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.यात संस्थेतील मोठा पदस्थ व्यक्ती असल्याशिवाय सदरचा प्रकार होऊच शकत नाही असा संशय यानिमित्ताने निर्माण होत आहे.

कनोसा कॉन्व्हेंट सह शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाच्या नावाखाली पालकांच्या आर्थिक लूट केली जात आहे.याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांची नेमकी भूमिका काय ? त्यांना हा प्रकार माहित नसेल का ? हा आकलना पलीकडचा विषय आहे.शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील कठोर भूमिका घेऊन असं गैर कृत्य करणाऱ्या संस्थाचालकांना चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध