Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी विहित कालमर्यादेत खर्चाचे नियोजन करावे ; जिल्हाधिकारी अभिनव गोयल



धुळे : दिनांक 10 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त); जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करण्यात येणा-या विविध विकास कामांना गती देत या योजनेंतर्गत वितरीत होणारा निधीही विहित कालावधीत खर्चाचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल दिल्या आहेत.


आज येथील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची सर्वसाधारण,आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती उपयोजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, मनपा आयुक्त देविदास टेकाळे, उपवनसंरक्षक नितीन सिंग,समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील,प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील,जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.गोयल म्हणाले की, शासनाने सन 2023-2024 करीता विभागांच्या मागणीप्रमाणे बीडीएस प्रणालीवर निधी उपलब्ध करुन दिला आहे.सर्वसाधारणपणे येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदेसाठी निवडणूका लागू शकतात.तसेच फेब्रुवारी, 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणूका लक्षात घेता प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन तांत्रिक मान्यतेसह प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव त्वरीत सादर करुन मागील वर्षांप्रमाणे 100 टक्के निधी खर्च होईल याकडे यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन यंत्रणांनी विकास कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन करावे.जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडा,वस्ती,पाड्यातील विद्युत जोडणी, नवीन रोहित्र कामांना गती देण्यासाठी विद्युत विभागाने सर्व्हेक्षण करुन प्रस्ताव सादर करावेत.जिल्हा परिषद, जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणात पाझर तलावाची कामे घ्यावीत.ज्याठिकाणी ग्रामपंचायतीस इमारती नाही तेथे नवीन इमारत बांधकामासाठी तसेच नवीन शाळा इमारतीसाठी प्रस्ताव सादर करावा.ग्रामपंचायतीमध्ये जागा उपलब्ध झाल्यास नवीन स्मशानभूमीसाठी प्रस्ताव सादर करावा. शालेय वर्ग खोली,स्वच्छतागृहाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावेत. यंत्रणांनी मागील वर्षांतील दायित्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. क्रीडा विभागाने जिल्हा परिषदेच्या शाळा, ग्रामपंचायत,आश्रमशाळेत क्रीडा विकास योजनेंतर्गत कामे घ्यावेत. आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागाने औषधे खरेदी करावीत.दुर्गम भागातील, रस्ते,सिंचन,विद्युत,शाळा,अंगणवाडी बांधकामाची कामे प्राधान्याने घ्यावीत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.

जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत उपलब्ध निधी व खर्चाची माहिती यावेळी दिली.तसेच नाविण्यपूर्ण योजनेत कामांचे प्रस्ताव सादर करतांना शासकीय मालमत्ता निर्माण होतील त्यादृष्टीने नाविण्यपूर्ण योजनेचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यंत्रणेला दिल्यात.बैठकीत चालू वर्षाचा मंजूर निधी व झालेला खर्च व पुढील वर्षांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीस विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध