Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

नंदुरबार शहर व उपनगर परीसरात दूध भेसळ तपासणीची धडक मोहीम; दुधाची तपासणी,पथक पाहून तीन कैन दूध सोडून विक्रेता फरार...!



नंदूरबार(प्रतिनिधी):-सायंकाळ सत्रात नंदुरबार शहर व नंदुरबार उपनगर परीसरात दूध भेसळ तपासणीची धडक मोहीम राबविण्यात आली.एकुण 4 दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते व 1 अज्ञात दूध विक्रेता यांचेकडील दुधाची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये एक दूध फेरीवाल्याच्या दुधात 13 ते 14 टक्के पाणी भेसळ, अनैसर्गिक वास आढळून आल्याने 30 लीटर दूध नष्ट करण्यात आले. सदर दुधाचे नमुने अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेण्यात आले आहे. 

तसेच नंदुरबार उपनगरातील सी बी पेट्रोल पंप, सिंधी काॅलनी परिसरातील रस्त्यावर दूध विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यांच्या दुधाची तपासणी करण्यासाठी गेलेले पथक पाहून एक विक्रेता 3 कॅन दूध असलेले सोडून पसार झाला. सदर 3 कॅनमधील दुधाची तपासणी केली असता सदर दुधात 33 टक्के ते 48 टक्के पाणी भेसळ, अनैसर्गिक वास व चव तसेच रंग आढळून आल्याने 120 लीटर दूध नष्ट करण्यात आले. परंतू सदर दूध विक्रेता पसार झाल्याने औपचारिक दूध नमुना अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेण्यात आलेला नाही.परंतू सदर विक्रेत्यांविरोधात नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवी कलम 272 व 273 अन्वये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. तसेच वैध मापन शास्त्र नंदुरबार विभागामार्फत 3 दूध विक्रेत्यांच्या वजन व मापे पडताळणीत उल्लंघन आढळून आल्याने 3 खटले नोंदविण्यात आले आहे. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी नंदुरबार धनंजय गोगटे, अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे  यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी धुळे/नंदुरबार डाॅ. अमित रमेश पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागा नंदुरबार आ.भा. पवार,
निरीक्षक वैध मापन शास्त्र नंदुरबार एस बी सोनवणे, प्रितेश गोंधळी, मुकेश तमायचेकर विस्तार संकलन जिदुविअ कार्यालय धुळे व पोलीस प्रशासन विभाग नंदुरबार उपनगर पोलीस हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध