Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ जून, २०२४

धुळे शहर अपर तहसील कार्यालयातील प्रकार जप्त ट्रॅक्टर सोडविण्यासाठी लाच घेणारा शिपाई जाळ्यात...!



धुळे प्रतिनिधी:- वाहतुकीचे जप्त ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना धुळे शहर अपर तहसील कार्यालयातील शिपायाला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाने सोमवारी (ता.२४) सायंकाळी ही कारवाई केली. नारायण पोपट फुलपगारे असे लाचखोर शिपायाचे नाव आहे. लाचेची रक्कम फोन-पेद्वारे घेताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकला. त्याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
 
तक्रारदाराचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. ते ट्रॅक्टरने शहरालगत वडेल रोड-वलवाडी परिसरात २५ नोव्हेंबर २०२२ ला वाळू वाहतूक करत होते. देवपूर (वलवाडी) तलाठ्याने ट्रॅक्टरचा पंचनामा करून शहर अपर तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रॅक्टर जमा करून तक्रारदाराला एक लाख ३० हजार ५०० रुपये दंडाची नोटीस दिली.

दंडाची रक्कम तक्रारदाराने ६ जून २०२४ ला चलनाद्वारे बँकेत भरली. चलन पावती अपर तहसील कार्यालयात जमा केली. नंतर तक्रारदार ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी अपर तहसील कार्यालयात गेला असता त्यांची कार्यालयातील शिपाई नारायण फुलपगारे याच्याशी भेट झाली. त्याने तक्रारदाराकडे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली
 
या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात सात जूनला तक्रार केली. याअनुषंगाने त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी केली असता शिपाई फुलपगारे याने तक्रारदाराचे ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तडजोडीअंती दोन हजारांच्या लाचेची मागणी केली.

सोमवारी (ता.२४) सायंकाळी तक्रारदाराने पंचासमक्ष शिपाई फुलपगारे याची भेट घेतली असता त्याला दोन हजारांच्या लाचेची रक्कम फोन-पेद्वारे दिली. ती स्वीकारताना शिपायाला पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे येथील पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध