Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ११ जुलै, २०२४

शिरपूर तालुक्यातील महिला भगिनींनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने" चा लाभ घ्यावा, प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी - आ. अमरिशभाई पटेल यांचे आवाहन



शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यातील महिला भगिनींनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने" चा लाभ घ्यावा. शिरपूर तालुक्यातून कोणीही या अतिशय महत्त्वपूर्ण योजनेतून वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

शिरपूर येथे आर.सी.पटेल मेन बिल्डिंग मधील 'राजगोपाल भंडारी हॉल' मध्ये 9 जुलै 2024 रोजी सकाळी महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात बैठक व पीपीटी द्वारे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

आमदार अमरिशभाई पटेल, तहसीलदार महेंद्र माळी, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, गट विकास अधिकारी संजय सोनवणे, गट शिक्षणाधिकारी गणेश सुरवाडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी-1 वैशाली निकम, बालविकास प्रकल्प अधिकारी-2 श्रीमती पी.आर.पाटील, शहरी विभाग पर्यवेक्षिका श्रीमती एस.वाय.सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शिरपूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका, शिरपूर आमदार कार्यालयातील स्वयंसेवक टीम, भूपेशभाई फ्रेंड सर्कलचे स्वयंसेवक व कार्यकर्ते, तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले, शासनाने महिलांच्या विकासासाठी अतिशय चांगली योजना कार्यान्वित केली आहे. यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व मनापासून प्रयत्न करणे गरजेचे आहे. या योजने अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील मुली व महिलांना दरमहा रु. 1500 चा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न करावे. असंख्य गरजू व गोरगरीबांना या योजनेचा लाभ मिळणार असून हजारो कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे. म्हणून, या पुण्याच्या कामात सर्वांनी मनापासून हातभार लावून लाभार्थ्यांचे प्रस्ताव अचूकपणे पूर्ण करून घ्यावे. आपण आमदार कार्यालयामार्फत व भूपेशभाई फ्रेंड सर्कल मार्फत तसेच आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत शहरात व गावोगावी हे अभियान राबवत आहोत असे प्रतिपादन आमदार अमरिशभाई पटेल यांनी यावेळी केले.

यावेळी तहसीलदार महेंद्र माळी, गट विकास अधिकारी संजय सोनवणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली निकम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शिरपूर तालुक्यातून कोणीही वंचित राहणार नाही याबाबत योग्य त्या सूचना दिल्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध