अमळनेर i उपसंपादक– शामकांत पाटील
अमळनेर : एकेकाळी राज्यभर आदर्शगावाचा बोलबाला असलेले तालुक्यातील सुंदरपट्टी गावात सद्दस्थितीत समस्यांचा पाढा वाचला जात आहे. ग्रामप्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने गावातील गटारी तुंबल्या असून रस्तेही चिखलमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करणे आवश्यक असताना साधा मुरूमही न टाकला गेल्याने पावसाच्या पाण्याने गावात प्रवेश करणारा रस्ता चिखलमय झाला आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी अंगणवाडी, जि.प. मराठीशाळा, बसस्थानक, ग्रा.पं. कार्यालय असल्याने नेहमीच लहान बालकांपासून मोठ्यांची वर्दळ असते. गावांत चिखलामुळे साधे चालणेही कठीण झाले आहे.
पावसाळ्यात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागावी म्हणून गटारी स्वच्छ असणे आवश्यक आहे. मात्र पावसाळ्या दरम्यान गटारीच काढल्या न गेल्याने त्या तुंबल्या असल्याकारणाने सर्वत्र दुर्गंधी पसरून डास,मच्छरांची उत्पत्ती झाली आहे. साहजिकच अबालवृद्धांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सरपंच व ग्रामसेवकांना माजी सरपंच सुरेश पाटील यांनी उपाययोजनाबाबत वेळोवेळी सांगूनही त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड केल्याचा आरोप होत आहे. ग्रामप्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा