Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० जून, २०२५

बेटावद कैरी बाजार गजबजला, लोणचे साठी कैरी खरेदी साठी नागरिकांची गर्दी



बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद हे गाव लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीच्या बाजारासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सध्या येथे कैरी बाजारात प्रचंड गजबजाट असून, नागरिकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. मागील वर्षी प्रति किलो ₹३० ते ₹५० या दराने मिळणारी कैरी यंदा ₹७० ते ₹९० दराने विकली जात आहे, ज्यामुळे ग्राहकांची खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

या दरवाढीचे प्रमुख कारण म्हणजे गुजरातमधून होणाऱ्या कैरीच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. बेटावदमधील अनेक स्थानिक व्यापारी गुजरातमध्ये जाऊन कैरी खरेदी करतात व बाजाराच्या दिवशी येथील बाजारात विक्री करतात. मात्र यावर्षी गुजरातमधील उत्पादनात घट झाल्याने, पुरवठा अपुरा पडतो आहे व दरात मोठी वाढ झाली आहे.

बाजारात विशेषतः 'गावराणी,सरदार ' आणि 'पसाट्या' जातीच्या कैऱ्यांना अधिक मागणी आहे. या जाती लोणच्यासाठी सर्वोत्तम मानल्या जात असल्यामुळे ग्राहक या जातींच्या कैऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

बाजारात केवळ कैरीच नाही, तर लोणच्यासाठी लागणारे गावराणी लसूण, विविध प्रकारचे मसाले, मोहरी,मेथी, हळद, मीठ आणि घरगुती तयार लोणचे मसाले,चिनी मातीच्या बरण्या यांचीही दुकाने मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण बाजार गजबजला आहे

कैरी फोडून देणाऱ्यांना प्रति किलो दहा रुपये दर दिला जात असून, ही सेवा अनेक तरुणांसाठी एक उदरनिर्वाहाचे साधन ठरत आहे. कैरी फोडणीसाठी मोठ्या प्रमाणात अंमळनेर येथून तरुण आलेले असतात.

बेटावद बाजारात मुडावद, पढावद, पाष्टे, म्हलसर, भिलाली, बाम्हणे, शहापूर या आजूबाजूच्या गावांमधून नागरिक कैरी खरेदीसाठी येत आहेत

एका स्थानिक व्यापाऱ्यांने सांगितले की, "कैरीच्या उत्पन्नात घट झाल्याने, मागणीप्रमाणे पुरवठा होत नसल्याने दर आणखी वाढू शकतात." त्यामुळे कैरी खरेदीसाठी नागरिकांनी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध