Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० जुलै, २०२५

बेटावद येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा – १२ हजारांचा मुद्देमाल जप्त



शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात वडार वाडा परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यावर नरडाणा पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नरडाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बेटावद गावातील वडार वाडा येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती नरडाणा पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पीआय निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी ७ वाजता पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली.

कारवाई दरम्यान गावठी दारू तयार करण्यासाठी वापरात आणलेली अवैध हात भट्ट्यांवर छापा टाकून त्यांचा नायनाट करण्यात आला. या प्लास्टिकच्या ड्रममध्ये सुमारे ५,४०० रुपयांची गावठी हातभट्टी दारू, ६,६०० रुपयांचे निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम, मातीचे माठ आणि नवसागर मिश्रित २२० लिटर रसायन असा एकूण १२,००० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

सदर अड्डा लताबाई वडार (वय ४४) हिच्या मालकीचा असून तीच हे बेकायदेशीर धंदे चालवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील गोसावी, तसेच पीआय निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलिस अंमलदार अजय सोनवणे, पोहेकॉ साहेबराव पावरा, पोना भुरा पाटील, पोको विनोद कोळी, प्रशांत पाटील, अनिल सोनवणे यांनी सहभाग घेतला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध