Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ जुलै, २०२५

प्रसूती रजेच्या बदल्यात लाच मागणारी मुख्याध्यापिका व लिपीक एसीबीच्या जाळ्यात...!



धुळे प्रतिनिधी :- "शिक्षणाचे मंदिर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील खिरोदा येथे उघडकीस आली आहे.

जनता शिक्षण मंडळ, खिरोदा संचलित धनाजी नाना विद्यालय, खिरोदा येथील मुख्याध्यापिका सौ.मनिषा पितांबर महाजन आणि कनिष्ठ लिपीक आशिष यशवंत पाटील यांनी एकूण ३६,०००/- रुपयांची लाच स्विकारताना अटकेत घेतले आहेत.

तक्रारदार यांच्या सुनेने, जी सदर विद्यालयात कायमस्वरुपी उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे, प्रसूती रजेच्या मंजुरीसाठी मुख्याध्यापिका महाजन यांच्याकडे २ जून २०२५ रोजी वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज सादर केला होता. मात्र, महाजन यांनी ही रजा मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे प्रती महिना ₹६,०००/- प्रमाणे, सहा महिन्यांसाठी एकूण ₹३६,०००/- लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने ही माहिती त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांना दिली. त्यानंतर ७ जुलै २०२५ रोजी, पंचासमक्ष सापळा रचून ही लाच मुख्याध्यापिका महाजन यांनी स्वतः स्वीकारून ती लाच शाळेतील लिपिक आशिष पाटील यांच्याकडे दिली व कपाटात ठेवण्यास सांगितले. यावेळी दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आली.

या कारवाईनंतर सावदा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षकसचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे संतोष पावरा, प्रविण मोरे, पोकॉ. रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील

प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिंबधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक मा. श्री माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

एका शिक्षिकेच्या प्रसूती रजेसारख्या मूलभूत हक्कावरसुद्धा भ्रष्टाचाराचे सावट पडणे ही शिक्षण संस्थांमधील व्यवस्थेची अध:पतन झालेली अवस्था दर्शवते. अशा प्रवृत्तींनी शिक्षणाच्या मंदिरात भ्रष्टाचाराचे जाळे पसरवणे हे केवळ बेकायदेशीर नव्हे तर अमानुष आणि संवेदनहीन कृत्य आहे.

"प्रसूती"सारख्या संवेदनशील कारणासाठी लाच मागणाऱ्या विकृत मानसिकतेचा आम्ही तीव्र निषेध करतो. अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध