Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

नरडाणा-शिंदखेडा पोलिसांची संयुक्त कारवाई — सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचे दोन ट्रक जप्त, 1 कोटी 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत


शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत दोन ट्रकसह एकूण 1 कोटी 92 लाख 99 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोन चालकांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारास 1.45 वाजता गोविंद पेट्रोल पंप, सार्वे शिवार, ता. शिंदखेडा येथे संशयास्पदरीत्या दोन ट्रक उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने छापा टाकून आयशर मोटार ट्रक (क्र. MP 13 GB 2822) आणि ट्रक (क्र. MH 27 DT 1343) ताब्यात घेतले.

या ट्रकांमधून महाराष्ट्रात बंदी असलेला राजनिवास, जाफराणी जर्दा, डायरेक्टर स्पेशल पानमसाला इत्यादी सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळला. चालक अमजद अजीज खान (वय 43, रा. रतलाम, म. प्र.) व अशफाक अब्बास खान (वय 47, रा. राजगड, जि. धार, म. प्र.) हे दोघेही ट्रकचालक हा माल शिरपूरकडून धुळे दिशेने चोरटी वाहतूक करत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दोन्ही ट्रक व त्यावरील माल जप्त करून एकूण 1 कोटी 92 लाख 99 हजार 40 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात भा. दं. सं. 2023 चे कलम 123, 274, 275, 223 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले पुढील तपास करीत आहेत.

ही यशस्वी कारवाई मा. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री अजय देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक सो. धुळे, तसेच श्री सुनील गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी सो. शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पो.नि. एच. एल. गायकवाड, तसेच पोलीस उपनिरीक्षक रवींद्र महाले, पोलीस कर्मचारी विजय आहेर, चालक अजय सोनवणे, पोहे.कॉ. गणेश पाटील, राईस शेख, ललित पाटील, भरत चव्हाण, नारायण गवळी, योगेश गिते, भुरा पाटील, अनिल सोनवणे, भोई, अर्पण मोरे, सचिन बागुल, चौधरी यांनी सहभाग घेतला.

या संयुक्त कारवाईमुळे महाराष्ट्रात चोरटी सुगंधित तंबाखू व पानमसाल्याची वाहतूक करणाऱ्या टोळ्यांवर धडकी
बसली असून, स्थानिक नागरिक व व्यापारी वर्गातून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध