Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ११ ऑक्टोबर, २०२५

९० हजारांचे कर्ज; वसुली तब्बल १ लाख ३० हजारांची


शिरपूर प्रतिनिधी/ अवैध सावकारी करून सर्वसामान्यांचे आर्थिक शोषण करणाऱ्या सावकारींना अखेर पोलिसांनी धडा शिकवला आहे. परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या कर्ज देऊन अवाजवी व्याजदराने वसुली करणाऱ्या चौघांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र सावकार अधिनियमान्वये करण्यात आली असून, सहायक निबंधक सूरज वानले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

सहायक निबंधक कार्यालयात आलेल्या तक्रारीची पडताळणी करून पोलिसांनी संशयितांच्या घरांवर झडती घेतली. या झडतीदरम्यान अवैध सावकारीची कागदपत्रं, धनादेश, व्यवहारांच्या डायऱ्या आणि खातेनोंदी हाती लागल्या.

संशयितांची नावे —
🔹 अजय नाना मंगळे (रा. करवंद, ता. शिरपूर)
🔹 जावेद शफी शेख (रा. गणेश कॉलनी, शिरपूर)
🔹 खंडू दगा महिरे (रा. खालचे गाव, बौद्धवाडा, शिरपूर)
🔹 प्रवीण दशरथ सोनवणे (रा. थाळनेर, ता. शिरपूर)

या चौघांनी कोणताही परवाना नसताना नागरिकांना कर्ज देऊन अवाजवी व्याज आकारले असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत जावेद शेख याने ९० हजार रुपयांच्या कर्जावर तब्बल १ लाख ३० हजार रुपये वसूल केल्याची कबुली दिली आहे.

सहायक निबंधक राजेंद्र वीरकर यांच्या आदेशानुसार शिरपूर पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक हेमंत खैरनार पुढील तपास करीत आहेत.

💬 शहरात वाढत्या अवैध सावकारीविरोधात ही कारवाई पोलिसांचा निर्धार दाखवणारी ठरली असून नागरिकांनी अशा घटनांची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध