Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

मुलीला पळवल्याच्या प्रकरणात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी परत अटक

अमळनेर : 
अल्पवयीन मुलीला पळवल्याच्या
प्रकरणात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी परत अटक करून 7 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे.

शहरातील एक अल्पवयीन मुलगी कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार अमळनेर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत होते. पीडित मुलगी शहरातील गुन्हेगार वैभव उर्फ बापू बोबड्या दिनेश गलांडे याच्या ताब्यात चाळीसगाव तालुक्यात बहिणीच्या घरच्या शेजारी राहत असल्याचे कळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. बोबड्याने पीडितेला तुझ्या आई वडिलांना व भावाला जीवे मारुन टाकेल अशी धमकी दिल्याने तिने पोलिसांना जबाबात मी स्वखुशीने निघून गेली होती व आमच्यात कोणतेही संबंध झालेले नव्हते असे सांगितल्याने न्यायालयाने त्याला एका दिवसात जामिनावर सोडले.
मात्र गुन्हेगार सहज सुटून जात असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिस निरीक्षक निकाम आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी पीडितेला बोबड्याकडून तुला कोणतीच भीती नसल्याचा विश्वास निर्माण केला. तिच्या घरच्यांनी देखील तिची समजूत घातली. पुन्हा पुरवणी जबाब घेण्यात आला. कायद्याचा योग्य वापर करत पोक्सो कलम 64 आणि कलम 3 व 4 वाढवण्यात आले. पोलिसांनी न्यायालयाला त्याच गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या आरोपी बोबड्या याला अटक करण्याची परवानगी मिळण्याचा प्रस्ताव पाठवला. न्यायालयाने आरोपीला त्याचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी देऊन त्याचे म्हणणे ऐकण्यासाठी त्याला बोलावण्याचा प्रयत्न केला. मात्र बोबड्या आपला मोबाईल बंद करून शहराबाहेर पळून गेला होता. आणि त्याने न्यायालयाला दिलेला पत्ता देखील चुकीचा आढळला. म्हणून न्यायालयाने त्याला अटक करण्याची परवानगी दिली. पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी आरोपीला शोधून पुन्हा न्यायालयात हजर केले. युक्तीवाद करून भक्कमपणे आपली बाजू मांडली आणि बोबड्याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध