Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, १ डिसेंबर, २०२५

शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडवून पळणारा तुमच्या शहराचा विकास करेल का ?



शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडवून पळणारा तुमच्या शहराचा विकास करेल का ? 
मलिदा लाटण्यासाठी केला पक्षप्रवेश, प्रतिभा शिंदे यांचा चौधरी यांच्यावर आरोपांचा भडिमार...

अमळनेर: शेतकऱ्यांचे कष्टाचे पैसे बुडवून पळणारा आणि मलिदा लाटण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणारा तुमच्या शहराचा विकास करेल का ? असा सवाल  प्रतिभा शिंदे यांनी शहर विकास आघाडीच्या प्रचार सभेदरम्यान केला. 
        शहरातील प्रभाग क्रमांक १८ मध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर, नगरसेवक पदाचे उमेदवार अनिता विनोद लांबोळे व गणेश आनंद पवार यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर आरोपांचा भडिमार केला. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी शहादा येथील सातपुडा साखर कारखाना विकत घेतला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांचे उसाचे पैसे न देता कारखाना कोट्यवधीत विकून त्यांनी पळ काढला. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना जाळ्यात फसवून निवडणुकीच्या तोंडावर मलिदा खाण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. असा हा पळपुटा नेता तुमच्या गावाचा विकास करेल का ? असा सवाल प्रतिभा शिंदे यांनी विचारला. तसेच त्यांचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर यांना वयाच्या चाळिशी पर्यंत मायभूमीची आठवण का आली नाही ? आरक्षण निघताच त्यांनी अमळनेर गाठण्याचे कारण सर्वांना माहीत आहे. मात्र ते आले तसेच निवडणुकीनंतर परत जातील. शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हे तालुक्यात अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून काम करत आहेत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून अनेकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या असून सहज उपलब्ध असणारा व सडेतोड व्यक्तिमत्व असलेला उमेदवार आहे. असे सांगत शहराचा सर्वांगीण विकासासाठी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील तालुका व शहर विकास आघाडीचे सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन प्रतिभा शिंदे यांनी केले. यावेळी माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, बाजार समिती सभापती अशोक पाटील, माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. मंचावर अनिता लांबोळे, हाजी नासिर, प्रवीण महाजन, गणेश पवार, भाईदास महाजन, पन्नालाल मावळे,गुलाब बोरसे, झुलाल बापु पाटिल यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध