Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ३ डिसेंबर, २०२५

शिरपूरमध्ये निवडणूक निकाल लांबल्याने लग्नाळूंची धांदल ईव्हीएमच्या स्ट्रॉग रूममुळे हॉल बंद – ‘मंडप की मशीन?’ असा घोळ!!



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर नगरपालिका निवडणुकीचा निकाल विलंबात अडकल्याने शहरात एक वेगळाच गोंधळ माजला आहे. निवडणूक आयोगाने ताब्यात घेतलेले आणि स्ट्रॉग रूम म्हणून सील केलेले काही विवाह हॉल अजूनही खुल्या न झाल्याने लग्नाळू जोडपी, पालक आणि हॉलमालक अक्षरशः हैराण झाले आहेत.

“लग्न ठरलंय… पण हॉलच बंद!”

शहरातील  प्रमुख हॉल स्ट्रॉग रूम म्हणून सील केल्याने आधीपासून बुकिंग केलेल्या लग्नसोहळ्यांची तणावपुर्ण गणितं बिघडली आहेत. दुल्हा-दुल्हनच्या घरात सनई-चौघडे सुरु…पण हॉलच्या दरवाजाला पोलिसांचा पहारा आणि ‘अनधिकृत प्रवेश निषिद्ध’ फलक!

“नवरदेव वेशीपाशी, पाहुणे तयारीत… मग हॉलची सोय करायची कशी?”

एका वधूपक्षाची आर्त हाक: “मुहूर्त ढळतोय, कॅटरिंग तयार आहे, फोटोग्राफरही येऊन बसलाय… पण हॉलवालाच म्हणतो निवडणूक संपेपर्यंत दरवाजा उघडणार नाही. हे कसले नियोजन?”

वरपक्षाचा सूरही तितकाच संतप्त:
“आम्ही बाराती घेऊन आलोय. पण आत ईव्हीएम ठेवलीय, बाहेर आमचं लग्न. हे नेमकं कुठलं शहरातील नियोजन?”

हॉलमालकांची ‘डबल अडचण’

हॉलमालकांचं म्हणणं स्पष्ट –
“आमचा काही दोष नाही! पोलिस व निवडणूक आयोगाचा कडक आदेश आहे. निकाल लागेपर्यंत हॉल उघडताच येणार नाही.” त्यामुळे त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी तगादा – निवडणूक विभागाची जबाबदारी आणि ग्राहकांची नाराजी!

शहरात चर्चेचा विषय : ‘ईव्हीएमला हॉल द्यायचा? की लग्नाला?’

सोशल मीडियावर तर मेम्सचा पाऊस –

“वराने बरोबर सात फेऱ्या घ्यायच्या की स्ट्रॉग रूमची सात फेऱ्या मारायच्या?”

“हॉलमध्ये वरपक्ष की व्हीव्हीआयपी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन?”

शिरपूरकरांची खिल्ली आणि नाराजी दोन्ही एकत्र दिसत आहे.

प्रशासन मात्र ठाम

अधिकाऱ्यांचे म्हणणे:
“निकाल प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्ट्रॉग रूम सीलबंद ठेवणे बंधनकारक आहे. सुरक्षा सर्वोच्च.” याचा अर्थ — लग्नाळूंचा ताण काही तास नव्हे तर दिवस-दोन दिवसही वाढू शकतो.

एकूण चित्र — लग्नसोहळे vs स्ट्रॉग रूम
लग्नाच्या दिवशी हॉल बंद पाहुण्यांची पंचाईत आयोजकांचे बुकिंग वाया आणि शहरभरात चर्चा फक्त दोन गोष्टींची
‘कमळ, धनुष्यबाण आणि लग्नाचा मंडप!’



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध