Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २१ जानेवारी, २०२६

धुळे ACB ची कारवाई धुळ्यात एसीबीचा मोठा धडाका; नगर रचना विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयातील ३ लाचखोर जाळ्यात!



धुळे प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचाराचा आणखी एक गंभीर प्रकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे उघडकीस आला आहे. शेतजमिनीचा ले-आऊट औद्योगिक प्रयोजनासाठी मंजूर करून देण्यासाठी तसेच बिनशेती आदेश काढण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगर रचना विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

आरोपी कोण?

या प्रकरणी खालील अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कल्पेश धनलाल चौरे (वय २८) – सहायक नगर रचनाकार, वर्ग-२, नगर रचना विभाग, धुळे किशोर भटा भोई (वय ४३) – सहायक आरेखक,नगर रचना व मूल्यनिर्धारण विभाग, धुळे दिपक आनंदा हटकर (वय ४०) – महसूल सहायक, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक /२०२६ नोंद करण्यात आला आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

तक्रारदारांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीपैकी १० हजार चौ. मीटर क्षेत्राचा ले-आऊट औद्योगिक वापरासाठी मंजूर करून घेणे व त्यासाठी आवश्यक असलेला बिनशेती आदेश मिळविण्यासाठी तक्रारदारांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज सादर केला होता. त्यानंतर आवश्यक कागदपत्रेही कार्यालयात जमा करण्यात आली होती. सदर प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ले-आऊट मंजुरीसाठी धुळे नगर रचना विभागाकडे पाठविण्यात आले होते.

लाचेची मागणी कशी झाली?

ले-आऊट मंजुरीसाठी सहायक आरेखक किशोर भोई यांनी तक्रारदारांकडे स्वतःसाठी १० हजार रुपये व सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांच्यासाठी ३० हजार रुपये, अशी एकूण ५० हजार रुपयांची लाच मागितली. यातील १० हजार रुपये भोई यांनी ऑनलाईन स्वीकारले, तर उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्यास सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत कार्यरत असलेले महसूल सहायक दिपक हटकर यांनी देखील बिनशेती आदेश काढण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

एसीबीकडे तक्रार व पडताळणी

सतत होणाऱ्या लाच मागणीला कंटाळून तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून तक्रार दाखल केली. त्यानंतर दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान सहायक आरेखक भोई यांनी स्वतःसाठी व चौरे यांच्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच सहायक नगर रचनाकार चौरे यांनी फोनवरून तक्रारदारांना पैसे भोई यांच्याकडे देण्यास सांगितल्याचेही स्पष्ट झाले. महसूल सहायक हटकर यांनी देखील लाच मागणी केल्याची पुष्टी झाली.

सापळा कारवाई

तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर दि. २१ जानेवारी २०२६ रोजी एसीबीने सापळा रचला. या सापळा कारवाईदरम्यान सहायक नगर रचनाकार कल्पेश चौरे यांनी तक्रारदारांकडून ३० हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारले आणि त्याच क्षणी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
स्वीकारलेली लाच रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी

सापळा पर्यवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.धुळे सापळा अधिकारी यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.धुळे सापळा पथक धुळे पदमावती कलाल, पोलीस निरीक्षक, पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रविण मोरे, पोकॉ. मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे, जगदीश बडगुजर व कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.
 
लाचखोर हादरले : नवीन वर्षात चार कारवायांचा धडाका

धुळे एसीबीने लाचखोरांविरोधात मोहिम तीव्र केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला तब्बल चार बड्या कारवाया एसीबीने लाचखोरांविरोधात केल्याने लाचखोर भीतीच्या सावटाखाली आहेत. शासकीय करून देण्यासाठी कुणीही लाच मागत अथवा घेत असल्यास एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे (मो.94037-47157) यांनी केले आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध