Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

मंत्र्यांच्या मतदारसंघातच गुटखा-तंबाखूचा काळाबाजार! प्रशासन अपयशी ठरल्याचा धक्कादायक पर्दाफाश



नाशिक | प्रतिनिधी
राज्यात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूवर बंदी असताना, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रीच असलेल्या नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातच कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना सुरू असल्याचे उघडकीस आल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. कायद्याची थट्टा करत, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून तळेगाव (ता. दिंडोरी) येथे सुगंधित तंबाखू, पानमसाला, गुटखा, जर्दा, सिगारेट्स यांचे सर्रास उत्पादन सुरू होते.

अन्न व औषध प्रशासनाच्या छाप्यात हा बेकायदेशीर कारखाना रंगेहात पकडला गेला. हजारो किलो प्रतिबंधित कच्चा माल, तयार गुटखा-तंबाखू, पॅकिंग साहित्य आणि महागडी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार हा काळाबाजार कोट्यवधी रुपयांचा असून, राज्यासह परराज्यातही विषारी मालाचा पुरवठा सुरू असल्याचा गंभीर संशय आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या खात्यावर बंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, त्याच मंत्र्यांच्या मतदारसंघात हा उद्योग फोफावत होता. मग प्रश्न उपस्थित होतो — स्थानिक प्रशासन झोपेत होते की जाणूनबुजून डोळेझाक केली जात होती? इतका मोठा कारखाना वर्षानुवर्षे सुरू असताना कोणाचे आशीर्वाद होते, याची सखोल चौकशी होणार का?
गुटखा-तंबाखूमुळे तरुणांचे आरोग्य उद्ध्वस्त होत असताना, अशा कारखान्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर केवळ कारखानामालकांवर नव्हे, तर जबाबदार अधिकारी व साखळीतील सर्व घटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी तीव्र मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा, “बंदी केवळ कागदावर आणि गुटखा मोकाट” अशीच स्थिती कायम राहणार, हे स्पष्ट आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध