Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

अंमली गुन्हा दाबण्यासाठी लाच; थाळनेरचे चार पोलिस हवालदार अडकले



शिरपूर प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या चार पोलिस हवालदारांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडा, नागेश्वर पाडा येथील रहिवासी यांच्या विरोधात दिनांक १८ ऑक्टोबर रोजी शिरपूर पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी संबंधित पोलिस हवालदारांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला तीन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ही रक्कम दोन लाख रुपयांवर ठरविण्यात आली.

या प्रकरणी तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सापळा रचून सोमवारी दोन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलिस हवालदार मुकेश पावरा याला रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात सहभागी असलेले भुषण रामोळे, धनराज मालचे व किरण सोनवणे हे अन्य तीन हवालदार फरार झाले आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत असून, आरोपी हवालदारांनी यापूर्वीही अशाच प्रकारचे गैरप्रकार केले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, चारही हवालदारांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांकडूनच लाच मागितली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध