Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २४ जानेवारी, २०२६

शेळगाव गटात भाजपाचा नवा डाव; शेतकरी पुत्र शरद पवार यांचे अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन...

परंडा, दि. २४ तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांपैकी शेळगाव हा गट खुल्या प्रवर्गासाठी असून या गटात एकूण २१,७९९मतदार आहेत. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या या गटातून मागील निवडणुकीत भाजपाच्या वाटेफळ येथील सखुबाई रमेश पवार या विजयी झाल्या होत्या. त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती पद भूषवले होते.

यावेळी भाजपा पक्षाने चिंचपूर बु. येथील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, तरुण, स्वच्छ प्रतिमेच्या आणि सर्वसामान्यांतून पुढे आलेल्या शेतकरी पुत्र शरद रामदास पवार यांना उमेदवारीची संधी दिली आहे. आज त्यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह प्रचंड व अभूतपूर्व शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपा तालुका अध्यक्ष अरविंद रगडे, तालुका उपाध्यक्ष सतीश देवकर, युवा नेते संकेत ठाकूर, रमेश पवार, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिल पाटील, चिंचपूर बु. सरपंच डॉ. महेश देवकर, माजी उपसरपंच महादेव शिंदे, नितीन सावंत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोषणाबाजी व उत्साहपूर्ण वातावरणात अर्ज दाखल झाल्याने परिसर दणाणून गेला होता.

विशेष बाब म्हणजे, शरद पवार यांनी कोणतेही पद नसताना मागील काही महिन्यांपासून स्वखर्चातून अनेक विकासकामे करून जनतेशी थेट नाळ जोडली आहे. रस्ते दुरुस्ती, महापुरातील पूरग्रस्ताना मदत, सामाजिक उपक्रम यांसह शेतकरी प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळत नसल्याने त्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. प्रशासनाने दखल न घेतल्यास ‘रस्ता रोखो आंदोलन’ छेडण्याचा ठाम इशाराही त्यांनी दिला होता. या लढाऊ भूमिकेमुळे “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी थेट भिडणारा नेता” अशी त्यांची ओळख तालुक्यात निर्माण झाली आहे.

 संघर्षशील नेतृत्व, थेट संवाद आणि विकासाची स्पष्ट दृष्टी यामुळे शरद र पवार हे शेळगाव गटातील सर्वसामान्य जनतेची पहिली पसंती ठरत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. नवखा चेहरा असला तरी कामाच्या जोरावर विश्वास संपादन करणाऱ्या या उमेदवारामुळे शेळगाव गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असून, भाजपासाठी ही निवडणूक विकासाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध