Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

प्रकाशा-डामरखेडा मार्गावर लोखंडी अडथळ्यांमुळे प्रवाशांची कोंडी; याहा मोगी माता यात्रेकरूंचे हाल



प्रकाशा प्रतिनिधी :- प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी उभारलेले लोखंडी अडथळे आता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अवजड वाहनांना रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या या सुमारे दहा फूट उंचीच्या अडथळ्यांमुळे लहान वाहने आणि प्रवासी बसेसनाही मार्ग काढणे कठीण झाले असून, या मार्गावर तासन्तास वाहतूक ठप्प होत आहे.

लोखंडी अडथळ्यांचा फटका
सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या कामामुळे या मार्गावरून अवजड वाहतूक बंद केली आहे. त्यासाठी रस्त्यावर कायमस्वरूपी लोखंडी गर्डर बसवून उंची मर्यादित केली आहे. मात्र, हे अडथळे बसवताना केवळ अवजड वाहनांचा विचार करण्यात आल्याने, किरकोळ माल वाहून नेणारी लहान वाहने किंवा उंचीवर साहित्य असलेली प्रवासी वाहने यामध्ये अडकून पडत आहेत. यामुळे साध्या मालवाहू रिक्षा आणि टेम्पो चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.

सध्या महाशिवरात्रीचे औचित्य साधून आदिवासी बांधवांचे कुलदैवत असलेल्या 'याहा मोगी' मातेची यात्रा भरली आहे. या यात्रेसाठी खान्देशासह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक खासगी वाहनांनी प्रवासाला निघाले आहेत. यात्रेकरूंच्या वाहनांची संख्या लक्षणीय असताना, या लोखंडी अडथळ्यांमुळे प्रकाशा-डामरखेडा मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. तासन्तास कोंडीत अडकून पडावे लागत असल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अवजड वाहनांना प्रतिबंध करणे आवश्यक असले तरी, यामुळे लहान वाहनांची आणि अत्यावश्यक सेवेतील गाड्यांची अडवणूक होऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या अडथळ्यांच्या रचनेत तातडीने सुधारणा करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, यात्रेच्या काळात ही कोंडी अधिक गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध