Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २५ मार्च, २०२६

शिरपूर रजिस्टर ऑफिसमध्ये ‘स्टॅम्प व्हेंडर-पंटर’चा सुळसुळाट; नागरिकांकडून सर्रास पैशांची वसुली!



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील रजिस्टर कार्यालयात सध्या भ्रष्टाचाराचा उघड उघड खेळ सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. स्टॅम्प व्हेंडर आणि त्यांच्या ‘पंटर’च्या माध्यमातून नागरिकांकडून बेकायदेशीररित्या पैशांची वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप होत असून, सामान्य जनतेला अक्षरशः लुबाडले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्ता खरेदी-विक्री, दस्त नोंदणी, करारपत्रे आदी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकृत शुल्कापेक्षा जादा पैसे मोजावे लागत आहेत. “काम लवकर करून देतो”, “अडथळे टाळतो” अशा आमिषांखाली पंटर नागरिकांना गाठून ठराविक रक्कम उकळत आहेत. विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचा आर्थिक फायदा असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.

कार्यालयाच्या परिसरातच काही ठराविक एजंट आणि पंटर दिवसभर ठाण मांडून बसलेले असतात. नव्याने येणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून त्यांना गोंधळात टाकले जाते आणि “प्रक्रिया क्लिष्ट आहे” असे सांगत जादा पैसे उकळले जातात. अनेक वेळा नागरिकांना अधिकृत फी किती आहे, याची स्पष्ट माहिती दिली जात नाही, याचाच फायदा घेत हा गैरप्रकार फोफावत आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “सरकारी फी पेक्षा दुप्पट-तिप्पट पैसे मोजावे लागतात. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशी भीती निर्माण केली जाते.” त्यामुळे सामान्य माणूस नाईलाजाने या जाळ्यात अडकतो.
या प्रकारामुळे शासनाच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणात जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर शिरपूर रजिस्टर कार्यालयातील हा ‘वसुलीचा बाजार’ थांबवण्यासाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध